‘कोरोना’ लसीकरणासाठी 3 कॉल, 3 SMS; संपर्कानंतरही व्यक्ती आली नाहीतर लसीकरणातून बाद

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकुळ घातला आहे. लाखो लोकांचे प्राण गेले आहेत. भारतात देखील कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. आता कोरोनावर लस उपलब्ध झाली असून देशात शनिवार (दि.16) पासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. कोरोना लसीकरण (corona vaccination ) अत्यंत महत्त्वाचे असले तरी ते स्वेच्छिक आहे. लसीकरणासाठी (corona vaccination ) नोंदणी केल्यानंतर व्यक्तीला तीन वेळा संपर्क केला जाणार आहे. संपर्क करुन देखील ती व्यक्ती आली नाहीतर त्या व्यक्तीला लसीकरणातून बाद करण्यात येणार आहे.

लसीकरणासाठी नाव नोंदणी केल्यानंतर संबंधित व्यक्तीला तीन वेळा फोनवरुन आणि तीन वेळा एसएमएस पाठवून लसीकरणाची आठवण करुन दिली जाणार आहे. मात्र, त्यानंतरही एखादी व्यक्ती लसीकरणासाठी आली नाही तर ती व्यक्ती लस घेण्यास उत्सुक नाही, असे समजून त्याचे नाव लसीकरणातून बाद करण्यात येणार असल्याची माहिती, केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली.

केईएम रुग्णालयात शनिवारी 243 सरकारी आणि खासगी आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. यामध्ये एफ/दक्षिणमध्ये येणाऱ्या परळ, लालबाग, शिवडी, काळाचौकी, भोईवाडा, नायगाव तर जी / दक्षिण आणि जी/उत्तर विभागात येणाऱ्या वरळी, प्रभादेवी, लोअर परळ व दादर, माहीम आणि धारावी येथील आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.