Corona Vaccination : हृदयविकाराच्या धक्क्यानेच ‘त्या’ वॉर्डबॉयचा मृत्यू, पोस्टमार्टेममधून समोर आली माहिती

मुरादाबाद : पोलीसनामा ऑनलाईन –  देशभरात शनिवारपासून (दि.16) कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. दरम्यान, लसीकरणानंतर उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद जिल्हा रुग्णालयातील एका वॉर्डबॉयचा रविवारी तब्येत बिघडून मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूला लस कारणीभूत असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला होता. मात्र आता पोस्टमार्टेम रिपोर्टमधून त्या वॉर्डबॉयच्या मृत्यूच्या नेमक्या कारणाचा उलगडा झाला आहे.त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे.

महिपाल सिंह (वय 46) असे या वॉर्डबॉयचे नाव होते. त्यांना शनिवारी कोरोनावरील लस दिली होती. त्यानंतर रविवारी तब्येत बिघडून त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर महिपाल यांचा मृत्यू लसीमुळे झाल्याचा दावा कुटुंबीयांनी केला होता. दरम्यान, हे आरोप फेटाळताना मुख्य आरोग्य अधिकारी एमसी गर्ग यांनी महिपाल यांच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मृत्यूचे कारण हे हृदयविकार असल्याचे म्हटले आहे. जिल्हाधिकारी राकेश कुमार सिंह यांनीही महिपाल सिंह यांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाल्याचे सांगितले आहे. तसेच महिपालच्या मृत्यूनंतर लसीबाबत अफवा पसरवणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाईल, अशी ताकीद यांनी दिली आहे. दरम्यान सीएमओने सांगितले की, लसीकरण अभियानामध्ये मुरादाबादमध्ये 479 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली होती. या सर्वांची प्रकृती उत्तम आहे.