Corona Vaccination : Covishield कोणी घ्यावी? Covaxin कोणासाठी चांगली? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत हाहाकार माजला आहे. दुसऱ्या लाटेमध्ये लोक संक्रमित होण्याचे प्रमाण वेगाने वाढले. देशात कोरोना विरोधात लसीकरण मोहिम सुरु असून कोरोनाची दुसरी लाट हळूहळू कमी होऊ लागली आहे. रुग्णांची संख्या कमी होत असताना लोकांमध्ये लसीकरणाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक लस घेत आहेत. परंतु लसीचे काही साईड इफेक्ट आहेत तसे त्याचे फायदे देखील आहेत.

लस कुठे मिळेल, कोणत्या लसीचा साठा उपलब्ध झाला आहे, यावरुन लोक स्लॉट बुक करण्यासाठी लक्ष ठेवून आहेत. अनेकांना सीरमची कोव्हिशिल्ड हवी आहे, तर काहींना कोव्हॅक्सीन. मात्र कोव्हिशिल्ड कोणी घ्यावी आणि कोव्हॅक्सिन कोणी घ्यावी यावर डॉक्टरांनी आपले मत मांडले आहे. अनेकवेळा तुमच्या शहरामध्ये कोव्हॅक्सिन उपलब्ध असते, मात्र कोव्हिशिल्डचा पहिला डोस पाहिजे असल्याने उपलब्ध लस घेण्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे अनेकांना प्रश्न पडतो की नेमकी कोणती लस घ्यावी. यासाठी डॉक्टरांनी कोणी कोणती लस घ्यावी यासंदर्भात मार्गदर्शन केले आहे.

लसीकरणाला उशीर होण्याचे कारण

लसीकरणाला उशीर करण्याचे एक कारण हे आहे की, काही लोक या लसी पेक्षा ती लस चांगली, असे सांगत सुटले आहेत. आयसीएमआर आणि भारत बायोटेकने कोव्हॅक्सिनची निर्मिती केली आहे. तर सीरम इन्स्टिट्यूटने कोव्हिशिल्ड या ब्रिटनच्या लसीचे उत्पादन केले आहे. या दोन्ही लसी जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मानकांमध्ये खऱ्या ठरल्या आहेत. दोन्ही लसी कोरोनापासून बचाव करण्यात परिणामकारक आहेत.

लसीकरणाला महत्त्व द्या

मेदांत मेडिसिटीचे प्रमुख डॉ. सुशील कटारिया यांनी एका मुलाखतीत सांगितले की, सध्या लसीच्या ब्रँडची निवड करण्याची वेळ नाही. जी लस मिळेत ती घ्यावी. लसीकरणाला महत्व दिले गेले पाहिजे.

18-44 वयोगटाने कोणती लस घ्यावी ?

18 – 44 वयोगटातील लोकांमध्ये कोव्हिशिल्ड घेतल्यानंतर कोव्हॅक्सिनच्या तुलनेत जास्त साईड इफेक्ट दिसून येत आहेत. कोव्हिशिल्ड ही इम्यूनोजेनिक प्रतिक्रिया दाखवत असल्याने त्याचे साईड इफेक्टही जास्त आहेत. यामुळे तरुणांनी ही लस टाळून कोव्हॅक्सिन घ्यावी, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. ज्यांची रोग प्रतिकार शक्ती कमजोर आहे त्यांनी कोव्हॅक्सिनऐवजी कोव्हिशिल्ड घ्यावी. कारण कोव्हिशिल्डचा दुसरा डोस जास्त अँटीबॉडी तयार करतो.

वृद्धांनी कोणती लस घ्यावी ?

डॉ. कटारिया यांच्या म्हणण्यानुसार, जे वृद्ध आहेत आणि जे रक्त पातळ करण्याची औषधे घेतात त्यांनी कोव्हॅक्सीन घेऊ नये. कोव्हिशिल्ड सामान्यपणे वयोवृद्ध किंवा गंभीर आजाराच्या लोकांना दिली जात आहे. तसेच काही रिपोर्टनुसार ज्यांना अ‍ॅलर्जी, ताप किंवा रोगप्रतिकारक शक्तीशी जोडलेले कोणतेही औषध सुरु आहे त्यांनी कोव्हॅक्सिन घेऊ नये असे सांगितले.