Corona Vaccine : गोठलेल्या स्थितीत सापडले ‘कोविशिल्ड’चे हजार डोस; चौकशीचे आदेश

गुवाहाटी : पोलिसनामा ऑनलाईन – देशभरात कोरोनाविरोधातील लसीकरणाला सुरुवात झालीय. यादरम्यान, आसाममधील आरोग्य विभागाला सोविर मेडिकल कॉलेज रुग्णालयामध्ये कोविशिल्ड कोरोना लसीच्या (corona vaccine) गोठलेल्या अवस्थेतील 1 हजार डोस असलेल्या 100 बाटल्या सापडल्यात. याप्रकरणी आरोग्य विभागाने याच्या तपासाचे आदेश दिलेत.

एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार आसाममधील बराक व्हॅली क्षेत्रामध्ये प्रमुख संशोधन संस्था एसएमसीएचमध्ये लसीचे डोस गोठण्याचे कारण कोल्ड चेन स्टोरेजमध्ये निर्माण झालेला दोष असू शकतो.

याबाबत आरोग्य सेवेचे संचालक मुनींद्र नाथ नकाते यांनी सांगितले, कोरोनावरील लस गोठलेल्या अवस्थेत सापडल्याची माहिती आम्हाला मिळालीय. साठवणुकीतील दोष हे याचे कारण असून शकते. मात्र, याचे खरे कारण हे पूर्णपणे तपास केल्यानंतर समोर येईल. गोठलेल्या लसींची उपयुक्तता तपासून घेण्यासाठी त्या तपासणीसाठी प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात येणाराय. यात कुणी कुचराई केल्याचे समोर आल्यास त्याच्याविरोधात कारवाई करण्यात येईल.

यादरम्यान, आसाममध्ये पहिल्या टप्प्यामध्ये सुमारे 1 लाख 90 हजार आरोग्य कर्मचार्‍यांना कोरोनावरील लस दिली जाणार आहे. या राष्ट्रव्यापी लसीकरण अभियानात कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनच्या लसींचे डोस दिले जात आहेत. सोमवारपर्यंत राज्यभरातील सुमारे 5 हजार 542 जणांना कोरोनावरील लस देण्यात येणार आहे.