भारतात जगातील सर्वात धोकादायक कोरोना व्हेरिएंट, विध्वंसातून सावरण्यासाठी लागतील अनेक वर्ष :तज्ञांचे मत

नवी दिल्ली : वृत्त संस्था – भारतात विध्वंस करत असलेला कोरोनाचा नवीन व्हेरिएंट पृथ्वीवर व्हायरसचा सर्वात संसर्गजन्य म्युटेशन असू शकतो, असा दावा बेल्झियमच्या युनिव्हर्सिटी ऑफ ल्युवेनचे प्रसिद्ध बायोलॉजिस्ट टॉम व्हेन्सलीयर्स यांनी केला आहे. व्हेन्सलीयर्स असे पहिले शास्त्रज्ञ होते ज्यांनी युके व्हेरिएंटला व्हायरसच्या इतर व्हर्जनच्या तुलनेत जास्त धोकादायक असल्याचे म्हटले होते. त्यांचा दावा पहिल्यांदा नाकारण्यात आला परंतु नंतर सर्वांनी मान्य केला.

अमेरिकन रेडियो नेटवर्क एनपीआरला दिलेल्या एका इंटरव्ह्यूत व्हेन्सलीयर्स यांनी म्हटले, भारतातील नवा व्हेरिएंट अतिशय संसर्गजन्य आहे. तो मोठ्या वेगाने पसरू शकतो. त्याच्या रूप बदलण्याच्या क्षमतेवर त्यांनी म्हटले की, तो जवळपास युके व्हेरिएंटसारखाच आहे. हा व्हायरस देशात प्रकोप वाढवण्याचे काम करत आहे. राजकीय पक्षांच्या रॅली, मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी आणि सावधगिरी बाळगण्याच्या पद्धतींकडे दुर्लक्ष केल्याने सुद्धा स्थिती अनियंत्रित झाली आहे.

एनपीआरच्या या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, हिवाळ्यात भारतातील स्थिती सामान्य दिसत होती. कोविड-19 संक्रमितांची संख्या स्थिर होती. इथपर्यंत की, प्रकरणांमध्ये सतत घसरण सुद्धा नोंदली जात होती. परंतु फेब्रुवारीच्या मध्यापासून मार्चच्या सुरुवातीपर्यंत स्थिती अचानक बदलली. व्हायरसने अचानक स्फोट केला. आता भारत कोरोनाच्या भयंकर लाटेचा सामना करत आहे. देशात रोज सुमारे चार लाख प्रकरणे नोंदली जात आहेत आणि दररोज सुमारे 4 हजार लोकांचा मृत्यू होत आहे.

जागतिक आरोग्य संघटनेतील भारताचे प्रतिनिधी डॉ. रेड्रिको एच. ऑफ्रिन या विध्वंसासाठी स्टँडर्ड ऑप्रेशन प्रोसीजर (एसओपीएस) चे पालन करण्यात देशाच्या अपयशाला जास्त दोषी मानतात. त्यांनी म्हटले की, आम्ही पाहिले की, भारतात लोकांनी कोविड-19 चा वेग कमी करण्यासाठी पुरेसे प्रयत्न केले नाहीत आणि यासाठी आज आपण येथे आहोत. खरं तर आपण स्वता व्हायरसला पसरण्याची संधी दिली.

भारतातील युनिसेफचे प्रतिनिधी डॉ. यास्मीन अली हक यांनी याच रिपोर्टमध्ये म्हटले की, व्हायरसने झालेल्या विध्वंसाच्या भरपाईत भारताला अनेक वर्ष लागू शकतात. आम्ही अगोदरपासूनच मुले, गरीब आणि उपेक्षित लोकांवर याचा प्रभाव पहात आहोत. डॉ. हक यांनी म्हटले की, शिक्षणाबाबत भारतात स्थिती अगोदरच खुप खराब होती. बाल मजूरी आणि बाल विवाहाच्या संख्या येथे सतत वाढत होत्या.

संयुक्त राष्ट्राने इशारा दिला आहे की, भारतात सध्या पॉझिटिव्हीटी रेट 19 टक्के आहे जो खुपच जास्त आहे. याचा अर्थ असा होतो की, भारतात इन्फेक्शनचा पॅटर्न तसाच आहे जसा आपण युरोप आणि अमेरिकेत पाहिला होता. मात्र याचा स्केल एकदम वेगळा होता. यामध्ये लोकसंख्येचे घनत्व सुद्धा एक कारक असू शकतो.