भारतामध्ये आता देखील येऊ शकते कोरोनाची लाट, आगामी 6 ते 18 महिने अत्यंत महत्वाचे – WHO च्या वैज्ञानिकांचा गंभीर इशारा

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढत आहे. रुग्णसंख्याही वाढताना दिसत आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत आरोग्ययंत्रणा अपुऱ्या पडत आहेत. त्यातच आता कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यानुसार, पुढील 6-18 महिने महत्त्वाचे असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) म्हटले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी कोरोना महामारीच्या लाटेबाबतचा इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले, की येत्या काळात कोरोनाची लाट भारतात अडचणीची ठरू शकते. कोरोनाच्या या लढाईत पुढील 6 ते 18 महिने भारताचे प्रयत्न अत्यंत महत्वपूर्ण राहतील. महामारीच्या या लढाईत सर्व काही व्हायरसच्या विकासावर आधारित आहे. वेरियंटच्या विरोधात लसींची क्षमता आणि लसींनी बनणाऱ्या इम्युनिटी किती लोकांचा बचाव करते. हे महत्वाचे ठरते. यामध्ये सर्वकाही बदलत आहे.

तसेच त्यांनी पुढे म्हटले, की या महामारीचा धोकादायक टप्पा नक्कीच नष्ट होईल. 2021 च्या अखेरपर्यंत आपल्याला हे दिसेल, की जेव्हा जगातील 30 टक्के लोकसंख्येचे लसीकरण होईल. त्यानंतरच मृतांचा आकडा कमी होण्याचे दिसू शकेल. त्यानंतर 2022 मध्ये लसीकरण वेगाने होऊ शकेल.

धोकादायक टप्पा बाकी

डॉ. स्वामीनाथन यांनी सांगितले, की आपण आता महामारीच्या एका टप्प्यातून जात आहोत. इथं अनेक धोकादायक टप्पे आहेत. आम्ही पुढील 6 ते 12 महिन्यांपर्यंत घडामोडींकडे लक्ष ठेऊन आहोत. हाच काळ कठीण काळ असू शकतो. त्यानंतर नियंत्रणासाठी दीर्घकालीन योजनेची गरज आहे. आम्हाला माहिती आहे, की लसींच्या माध्यमातून तयार झालेली इम्यूनिटी आणि नैसर्गिक इन्फेक्शनपासून बनणारी इम्युनिटी किमान 8 महिन्यांर्यंत राहते.