Sachin Sawant : ’20 मेपर्यंत महाराष्ट्राला लस मिळणार नसेल तर लस द्यायची कशी?’

मुंबईः पोलीसनामा ऑनलाइन – केंद्र सरकारने 1 मे पासून देशभरात 18 वर्षावरील लोकांना लसीकरण करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. दरम्यान याबाबत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले राज्यात 1 मेपासून 18 वर्षावरील सर्वांना लस दिली जाणार आहे. परंतु त्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीचे डोस आवश्यक आहेत. 20 मे पर्यंत मोदी सरकारने स्टॉक बुक करून ठेवल्याने राज्याला लस मिळणार नाही असे सीरमने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कळवले आहे. मग 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लस कशी द्यायची हा प्रश्न आहे. कोरोनाच्या इतक्या महिन्याच्या कालावधीत आपण लसीच्या तुटवड्याबद्दल साधी चर्चा करू शकत नाही. मोदीजी, तुमची रणनीती कुठे आहे असा सवाल सावंत यांनी उपस्थित केला आहे.

 

 

 

देशात लसीचा पुरवठा कसा करायचा यावर पर्याय नाही. मोदी सरकारने 2 कंपन्यांच्या पुरवठ्यावर मर्यादा आणल्या आहेत. आता राज्य सरकारने लस खरेदी करून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लस द्यावी असे म्हटले जात आहे. 45 वयोगटावरील नागरिकांबाबत केंद्र सरकार काळजी घेईल. संपूर्ण देशभरात लसीकरण कधीपर्यंत पूर्ण होईल याबाबत तारीख सांगू शकता का? असेही सावंत यांनी पंतप्रधान मोदींना विचारले आहे.

लसीच्या उपलब्धतेबाबत राज्य सरकारचे भारत बायोटेक आणि सीरमला पत्र
दरम्यान 1 मेपासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरणासाठी 12 कोटी डोस लागतील. त्याच्या उपलब्धतेबाबत आरोग्य विभागाने सीरम आणि भारत बायोटेक या दोन्ही कंपन्यांना पत्र पाठवले आहे. लसीकरणासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून एवढ्या मोठ्या संख्येच्या लसीकरणासाठी लसींची उपलब्धता हे मोठे आव्हान आहे. ही लस सरसकट मोफत द्यायची की आर्थिक दुर्बल घटकांतील नागरिकांना याबाबतचा अंतिम निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला जाणार आहे. त्यासाठीचा प्रस्ताव आरोग्य विभागाने पाठविला आहे. 18 ते 44 वयोगटातील लसीकरणासाठी कोविन ॲपवर नोंदणी करणे गरजेचे आहे. त्यानुसार लसीकरणाची वेळ निश्चित केली जाणार आहे. त्यामुळे 1 मेपासून लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी केले आहे.