आज येणार ‘त्या’ 800 नागरिकांचा ‘कोरोना’चा रिपोर्ट, दिल्लीनं ‘श्वास’ रोखला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोनामुळे हाहाकार उडाला आहे. कोरोना व्हायरसशी झगडताना देशाची राजधानी दिल्लीनं आज श्वास रोखून धरला आहे. तबलीघी जमात आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या जवळपास 800 जणांचा कोरोनाचा अहवाल आज येणार आहे. त्यापैकी किती लोकांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येतो याकडे दिल्ली सरकारसह दिल्लीकरांचे लक्ष लागून राहिले आहे. यामुळे आज दिल्लीतील कोरोनाबाधितांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी या अहवालाबाबत माहिती दिली आहे. आज सायंकाळपर्यंत या सर्वांचे अहवालाचा तपशील हाती येणार आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना सत्येंद्र जैन म्हणाले, दिल्लीत सध्या 1102 रुग्ण कोरोनाशी लढा देत आहेत. यातील 746 रुग्ण मरकझशी संबंधित असल्याची माहिती त्यांनी दिली. ज्या जमातींचा कोरोनाचा अहवाल येणार आहे. ते सध्या क्वारंटाईनमध्ये असल्याचे जैन यांनी सांगितले. या लोकांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणं आढळली नव्हती. परंतु कोरोनाबाधितांच्या संपर्कात आल्यानं त्यांची चाचणी करण्यात आली. यापूर्वी अनेक जमाती आढळून आले होते, मात्र त्यांच्यामध्ये कोरोनाचे कोणतेही लक्षणं आढळली नसल्याचे जैन यांनी सांगितले.

जमातींमधील ज्यांची कोरोना चाचणी पार पडली त्यात दिल्ली बाहेरच्यांचाही समावेश आहे. अर्थात ते दुसऱ्या राज्यांचे रहिवासी आहेत. यामध्ये काही परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे मरकजच्या 7 मजली इमारतीमधून 2 हजारापेक्षा अधिक जमातींना बाहेर काढण्यात आले होते. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे देखील त्यांना समजावण्यासाठी मरकझमध्ये दाखल झाले होते. या ठिकाणी उपस्थित 24 जण अगोदरपासूनच कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते.