कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाकरे सरकार अमरावती पॅटर्न वापरणार; जाणून घ्या काय आहे अमरावती पॅटर्न?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला असून, कोरोनाला अटकाव घालण्यासाठी राज्य सरकारने राज्यात टाळेबंदी करण्याची नियमावली पूर्ण केली गेली आहे. तर गेल्या दोन दिवसात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्ससहित अनेक घटकाशी चर्चा केली आहे. तर कोरोनाला थांबवण्यासाठी लॉकडाऊनसंदर्भात अमरावती पॅटर्न राबवण्यात येणार असल्याची चर्चा सुरु आहे. नेमका कसा आहे अमरावती पॅटर्न बघा.

अमरावती जिल्ह्यात फेब्रुवारी मध्ये अधिक वेगाने कोरोनाचा फैलाव झाला होता. येथे जानेवारी महिन्यात ३०० ते ५०० कोरोनाबाधित रुग्ण होते. परंतु ३ फेब्रुवारी रोजी ५०६ अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर रुग्णसंख्या वाढत गेली. २६ फेब्रुवारीपर्यंत सक्रिय रुग्णांची संख्या १२ पटीने वाढून ६ हजार ७४० वर पोहोचली.

कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारने सर्वप्रथम १८ फेब्रुवारी रोजी विकेंड लॉकडाऊन लावले. हा प्रयत्न अपयशी ठरला. २४ फेब्रुवारीपर्यंत २७१० नवे अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आढळून आले. विकेंड लॉकडाऊनदरम्यान बाजार, सार्वजनिक टिकाणे बंद ठेवण्यात आली. आत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या. तर धार्मिक कार्यासाठी ५ जणांची संख्या मर्यादित करण्यात आली.

लॉकडाऊनसंदर्भात चर्चा करताना मंत्री यशोमती ठाकूर यांनी म्हटले की, जर संपूर्ण राज्यामध्ये अमरावती मॉडेलचा वापर केला तर राज्यात गतीने वाढत असलेल्या कोरोनाच्या संसर्गाला थांबवता येणार आहे, असते त्यांनी म्हटले. दरम्यान, कोरोनाला रोखण्यासाठी २२ फेब्रुवारी ते १ मार्चदरम्यान, कडक लॉकडाऊन लावण्यात आला. त्यानंतर त्याची मुदत ८ मार्चपर्यंत वाढवण्यात आली. याचा मुख्य हेतू लोकांना गोळा होऊन गर्दी करण्यापासून रोखण्याचा होता. तसेच, फक्त अत्यावश्यक वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानांना सकाळी ९ ते संध्याकाली ५ वाजेपर्यंत उघडण्याची परवानगी देण्यात आली. शाळा, कोचिंग क्लासेस आणि इतर सार्वजनिक ठिकाणे बंद ठेवण्यात आली. सर्व सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांवर निर्बंध लादण्यात आले होते.

अमरावती शहरातील सरकारी ऑफिस आणि बँका १५ टक्के उपस्थितीसह उघडण्याची परवानगी देण्यात आली. ट्रान्सपोर्टला लॉकडाऊनमधून बाहेर ठेवण्यात आले. हॉटेल आणि रेस्टॉरंट्स यांना फक्त पॅक केलेले भोजन विक्री करण्याची परवानगी देण्यात आली आहे. हे लॉकडाऊन यशस्वी ठरले आणि संसर्गाची साखळी तुटली. तसेच, २४ फेब्रुवारी ते ३ मार्च दरम्यान सक्रिय रुग्णांची संख्या ४.५६ टक्क्यांनी घटली. त्यानंतर रुग्णाची संख्या घटत गेली. यावरून ३ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील बरी होण्याची संख्या ९६ टक्के होता. तर मृत्यूदर हा १.८ टक्के होता. २६ फेब्रुवारी रोजी रिकव्हरी रेट घटून ७९.१ टक्क्यांवर आला. त्यानंतर लॉकडाऊन लावल्यावर रिकव्हरी रेट वाढण्यास सुरुवात झाली. सध्या तो ९२ टक्क्यांवर पोहोचला आहे. नंतर ८ मार्चला टाळेबंदी उठवण्यात आली.