Coronavirus : कोरोनावर मात करणार्‍यांच्या शरीरात किती काळ राहते अँटिबॉडी? जाणून घ्या संशोधनातून समोर आलेली माहिती

टोकियो: पोलीसनामा ऑनलाइन – अवघा देश कोरोना संकटाचा सामना करत आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोना रुग्ण वाढीचा वेग कमी झाला आहे. मे महिन्याच्या प्रारंभी देशात दररोज 4 लाखांपेक्षा अधिक रुग्णसंख्या आढळत होती. आता हा आकडा 2.5 लाखांचा खाली आला आहे. दररोज 3 लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त होत आहेत. त्यातच आता कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांबद्दल आणखी एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तींच्या शरीरात अँटीबॉडीज तयार होतात. कोरोनावर मात केलेल्या 96 टक्के रुग्णांच्या शरीरात एका वर्षानंतरही अँटिबॉडीज कायम असतात, अशी माहिती जपानच्या योकोहामा सिटी विद्यापीठाने केलेल्या संशोधनातून समोर आली आहे.

कोरोनाची बाधा झालेल्या 250 व्यक्तींच्या शारिरीक स्थितीची चाचणी संशोधनात केली होती. संशोधनात सहभागी झालेल्यांमध्ये 21 ते 78 वयोगटातील व्यक्तींचा सहभाग होता. गेल्या फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान या व्यक्तींना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाची जास्त लक्षणे आढळलेल्या व्यक्तींच्या शरीरात एक वर्ष अँटिबॉडी कायम होत्या. तर कोरोनाची कमी आणि अजिबात लक्षणे नसलेल्या 97 टक्के व्यक्तींच्या शरीरात 6 महिन्यांपर्यंत अँटिबॉडी कायम राहिल्याचे संशोधनातून समोर आले आहे. कोरोना महामारी आल्यानंतर पहिल्याच महिन्यात संक्रमित झालेल्या व्यक्तींनी लस टोचून घेणे अतिशय गरजेचे असल्याचे संशोधन सांगत आहे. कोरोनाची सौम्य किंवा अजिबात लक्षण नसलेल्या व्यक्तींनी प्राधान्याने लसीकरण करून घ्यावे. . या व्यक्तींनी लस न घेतल्यास त्यांना ब्रिटन, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलमधील व्हेरिएंटचा धोका असल्याची माहिती संशोधनातून पुढे आली आहे.