Coronavirus Impact : पुण्यात छोटे व्यावसायिक आणि सेवा क्षेत्राला तडाखा ! विस्कटलेले अर्थकारण भाग – 3

पुणे (राजेंद्र पंढरपुरे) – शहरातील छोटे व्यावसायिक आणि सेवा क्षेत्र हे ही आर्थिक तडाख्यातून सुटलेले नाहीत. कधी नव्हे तो मध्यमवर्ग याचकाच्या भूमिकेत दिसत आहे.

औषधांची ठोक विक्री करणाऱ्या सदाशिव पेठेतील एका विक्रेत्याला कोरोनाची लागण झाली. त्याच्याकडील नोकर आणि त्याच्या संपर्कात आलेली लोकं अशा ३२ जणांना बाधा झाली. मे महिन्यात घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली. सदाशिव पेठेतील राजाराम मंडळ, ब्राह्मण मंगल कार्यालय या परिसरात औषधांची घाऊक बाजारपेठ आहे. ती बाजारपेठ तीन दिवस बंद ठेवावी लागली. या काळात उपनगरांमध्ये औषधे पोहोचविणाऱ्या डिलिव्हरी बॉय ची संख्या एकदम घटली. यातील काहिंनी भितीने काम सोडले तर, प्रतिबंधित क्षेत्रातून हे डिलिव्हरी बॉय येत असल्याने व्यापाऱ्यांनीच त्यांना काम देणे बंद केले. अतिशय गरिब आर्थिक स्थिती असलेले हे डिलिव्हरी बॉय अचानक बेकार झाले. याच दरम्यान मेडिकल रिप्रेझेंटिटीव्ह यांच्या भवितव्याची चर्चा झाली. अधिक माहिती घेता असे समजले की, या ही क्षेत्रातील अनेकांवर नोकरी गमावण्याची वेळ आली. त्या काळात पुण्यात टाळेबंदीबरोबरच संचारबंदीही होती. संचारबंदीमुळे स्वाभाविकच मेडिकल रिप्रेझेंटिटीव्ह फिल्डवर काम करु शकत नव्हते. तुम्ही फिल्डवर कामच केले नाहीत तर तुम्हाला पगार कसा द्यावयाचा असा मुद्दा काढून त्यांना कामावरुन कमी केले. काही कंपन्यांनी मेडिकल रिप्रेझेंटिटीव्हची गरज नसल्याचे सांगत त्यांना कामावरून कमी केले. वयाची तीस वर्षे पूर्ण झालेल्या मेडिकल रिप्रेझेंटिटीव्हजना बेकारीला सामोरे जावे लागले.

पुणे शहराच्या भोवती औद्योगिक वसाहती आहेत. लघु आणि मध्यम स्वरुपाची कारखानदारी या वसाहतींमध्ये आहे. या कारखान्यांना लागणारे स्पेअर पार्ट्स हार्डवेअरच्या बाजारातून पुरविले जातात. त्यातून सप्लायर असा घटक तयार झाला आहे. हा सप्लायर वितरणाच्या साखळीतला महत्त्वाचा घटक आहे. मार्च, एप्रिल, मे असे तीन महिने हार्डवेअरची बाजारपेठच बंद होती. त्यामुळे सप्लायर्सचा धंदा बंद राहिला. औद्योगिक वसाहती कच्चा माल आणि मनुष्यबळा अभावी पूर्ण क्षमतेने कार्यरत झालेल्या नाहीत. छोट्या-मोठ्या कारखान्यातील आनेकांना नोकरी गमवावी लागली आहे. अनेकजण भितीने गांवी निघून गेले आहेत. ऑफिसमधील आधिकारी वर्ग निम्म्या पगारावर काम करत आहे ही परिस्थिती किती काळ राहील ते सांगता येत नाही. काही विदेशी कंपन्यांचे स्पेअर पार्ट्स कमी किमतीचे असल्याने त्यांनाच मागणी असते. विमान कंपन्या तसेच जहाजांमार्फत मालाची ने-आण बंद असल्याने स्पेअर पार्ट्स उपलब्ध नाहीत त्यामुळे सप्लायर्सचा धंदा बंद असून पुढील चार, पाच महिन्यात तरी तो सुरु होईल का याची शंका आहे. हा असंघटीत घटक असल्याने त्यांच्या समस्या सरकारदरबारी कधी मांडल्याच जाणार नाहीत. एका सप्लायरने दिलेल्या माहितीनुसार पुण्यालगतच्या औद्योगिक वसाहतींमध्ये पाच ते दहा टक्केच उत्पादन सुरु झाले असल्याने आपल्याला ऑर्डर्स कोण देणार? हा तेथील व्यावसायिकांपुढे प्रश्न आहे.

छोटे दुकानदार, स्टेशनरी, कटलरी, बेकरी उत्पादने, कापड विक्रेते, छोट्या जागेत आइस्क्रीम पार्लर्स चालविणारे असे अक्षरशः हजारो छोटे व्यावसायिक (दुकानदार) पुणे शहरात आहेत. यातील बहुसंख्य दुकानदार भाडे तत्त्वावर जागा घेऊन दुकाने चालवितात. भाडे तत्त्वावर जागा घेऊन व्यवसाय करणारे व्यावसायिक साफ बुडाले आहेत. मोठ्या बाजारपेठेतील छोटी दुकाने, उपनगरातील रस्त्यालगतची दुकाने यांचा धंदा झालेला नाही. मात्र, जागेचे भाडे हे आता भुर्दंड वाटू लागले. सध्या आहे त्या मालाला गिऱ्हाईक नाही, व्यवहारच होत नाही आणि भाड्यापोटी खर्च होत आहे. अशा कात्रीत दुकानदार अडकल्याने काही दुकानदार दुकाने बंद करण्याच्या मनःस्थितीत आले आहेत.

सध्या फ्लॅट्सची खरेदी, विक्री बंद आहे आणि उच्च मध्यमवर्गीयांनाही आर्थिक तोशीस पडली आहे. अशा कारणाने घर सजावट, फर्निचर अशी कामें काढली जात नाहीत. त्याचा परिणाम लाकूड, पत्रे, स्टील व्यवसायावर झाला आहे. तेथील व्यापारी काळजीत आहेत. याही क्षेत्रात पुढील वर्षभर सुधारणा होईल असे वाटत नाही. प्लायवूड आदी लाकूड प्रकारांची वाहतूक थांबल्याने टेम्पो, ट्रक चालक यांना धंदा नाही. हातगाडीवालेही बसून आहेत. सुतारकाम करणाऱ्या कारागीरांनाही कामें नाहीत. अगदी किरकोळ कामें मिळाली तर त्यावर भागवावे लागत आहे. पण, त्यातही अनिश्चितताच आहे. फर्निचरची कामे करणारा नानापेठेतील एक छोटा कारखाना गेले पाच महिने बंदच आहे. यावरुन या व्यवसायातील मंदीचा अंदाज येतो. फर्निचरचे काम बंद असल्याने कुशनच्या वस्तूंनाही मागणी नाही. ते ही क्षेत्र आर्थिक अडचणीतच आहे. पुण्यातील आर्थिक उलाढालींचे मोठे क्षेत्र असलेले टिंबर मार्केट सुस्तावलेले असल्याने त्या अनुषंगिक सगळीच कामें ठप्प आहेत.