देशात अचानकपणे कसे वाढले कोरोनाचे नवे पॉझिटिव्ह? आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी सांगितलं कारण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशात मागील काही दिवसांपासून कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामागचे कारण आता केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले आहे. “कोरोनास प्रतिबंध करण्यासाठी लस आल्याने सर्व काही ठीक होईल, असे नागरिकांना वाटत आहे. त्यांना कोरोनाच्या संसर्गाचे गांभीर्य राहिले नाही. जनतेत कोरोनाबद्दलचा निष्काळजीपणा वाढला असून, ते हलक्यात घेत आहेत. म्हणूनच सुपर स्प्रेडरच्या घटना घडत आहे,” असे डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले आहे.

दिल्ली मध्ये कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्यावर डॉ. हर्षवर्धन यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, “कोरोना प्रतिबंध लस घेतल्यानंतर पुन्हा कोरोनाची लागण होण्याची घटना दुर्मिळ आहे. मात्र, लस घेतल्यावर कोरोनाची लागण झाली असेल तर जीवाला असलेला धोका कमी होतो. सर्व परिस्थितीमध्ये कोरोनाचा सामना करण्याची प्रक्रिया निश्चित झाली असून, सरकारने मंजूर केलेल्या दोन्ही लसी ( कोविशिल्ड, कोवॅक्सिन ) सुरक्षित आणि प्रभावी आहेत. त्यांचे डोस घेतल्यावर साइड इफेक्ट दिसून आले नाही. तरी देखील अनेकांना लसींवर संशय आहे. व्हॉट्सअ‍ॅपवरून फॉरवर्ड होणाऱ्या मेसेजवर विश्वास न ठेवता, लसीकरणासाठी पुढे या,” असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

टेस्टिंग, ट्रॅकिंग, ट्रीटमेंट हे अत्यंत गरजेचं आहे. आणखी जवळपास कोरोनाच्या ७ लसींची क्लिनिकल ट्रायल सुरु आहे. तर दोन डझन लसी प्री क्लिनिकल ट्रायल मध्ये आहेत. सर्व राज्यांना १७ जानेवारी २०२० पासून मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. पंतप्रधान, कॅबिनेट सचिव हे राज्यांच्या मुख्य सचिव अथवा आरोग्यमंत्र्यांशी सातत्याने संवाद साधत आहेत.

कोविन प्लॅटफॉर्मच्या साहाय्याने कोरोनावरील लसीकरण मोहीम सुरु असून, १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना ५० हजार केंद्रांवर लसीकरण केलं जाणार आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात नोंदणी झाली आहे. लसीकरण केंद्रावरही नोंदणी केली जाऊ शकते. कोरोनाबाबतचे वर्तन आणि लसीकरणासाठी थोडं वेळ दिल्यास आपण कोरोनावर नक्की विजय मिळवू, असेही केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी स्पष्ट केलं.