Coronavirus : कोविड-19 मुळं ‘या’ देशाच्या पंतप्रधानांचा मृत्यू, महिन्यापुर्वी झाली होती लागण

ADV

मबाबाने : पोलीसनामा ऑनलाइन – जगभरात ७ कोटी २६ लाख ४६ हजार ६१८ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर १६ लाख १८ हजार ९०८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाने जगातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींचाही मृत्यू झाला. त्यातच आता आफ्रिका खंडातील देश असलेल्या इस्वाटिनीचे पंतप्रधान एम्बरोसे डालामिनी यांचे कोरोनाने वयाच्या ५२ व्या वर्षी निधन झाले. डालमिनी यांना एक महिन्यापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर दक्षिण आफ्रिकेतील एका रुग्णालयात उपचार सुरु होते.

इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, इस्वाटिनीच्या सरकारने रविवारी रात्री आपल्या पंतप्रधानांच्या मृत्यूची अधिकृत घोषणा केली. इस्वाटिनीचे उपपंतप्रधान थेंबा मसुकु म्हणाले, देशाचे पंतप्रधान एम्बरोसे डलामिनी यांच्या अकाली निधनाची वार्ता देशातील नागरिकांना देण्याची सूचना राजपरिवाराकडून मिळाली.

१ डिसेंबरला इस्वाटिनीचे पंतप्रधान एम्बरोसे डलामिनी यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हा पंतप्रधानांची प्रकृती स्थिर होती. त्याचसोबत उपचाराला ते योग्य प्रकारे प्रतिक्रियाही देत होते. मात्र, रविवारी त्यांचे निधन झाल्याचे उपपंतप्रधान यांनी सांगितले.

इस्वाटिनी हा आफ्रिका खंडातील छोटासा देश असून, तेथे राजेशाही शासनव्यवस्था आहे. एम्बरोसे डलामिनी यांनी २०१८ साली पंतप्रधान पदाची सूत्रे स्वीकारली होती. तत्पूर्वी, ते एका कंपनीत सीईओ म्हणून कार्यरत होते. इस्वाटिनी बँकिंग सेक्टरमध्ये त्यांनी १८ वर्षाहून अधिक काळ काम केले होते. तसेच ते इस्वाटिनी नेडबँकचे व्यवस्थापकीय संचालकही राहिले आहे.