धक्कादायक ! AIIMS मधील 384 डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफ यांना कोरोनाची बाधा

बिहार/ पाटणा : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूने देशासह जगात थैमान घातले आहे. भारतात अनेक कोरोनाबाधीत रुग्ण आढळून येत आहे. दैनंदिन रुग्णसंख्या २ लाखाहून अधिक सापडत आहे. तर अनेक रुग्णांनी आपला प्राण गमावला आहे, यामुळे सगळीकडे चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. अशातच रुग्णांना बरे करणारे देवदूत डॉक्टर देखील कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. पाटणा येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (AIIMS ) कोरोनाने कहर केलाय. तेथे तब्बल ३८४ डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफला कोरोनाची लागण झाल्याची धक्कदायक माहिती समोर आलीय.

पाटणा येथील एम्सचे वैद्यकीय अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयातील ३८४ डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफ आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह झाला आहे. यामुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. तसेच, बिहारमधील पंचायत निवडणुका कोरोनाच्या वाढत्या प्रकरणात पुढे ढकलण्यात आल्या आहेत. निवडणुकीसंदर्भात अधिसूचना एप्रिल अखेर जारी करण्यात येणार होती, परंतु, आता ती पुढे ढकलण्यात आली. साथीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने पंचायत निवडणुका टाळल्या आहेत. आणि १५ दिवसांनंतर पुन्हा परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल आणि निर्णय घेतला जाणार आहे.

बिहारच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, मंगळवारी गेल्या २४ तासांत राज्यात कोरोनाचे १० हजार ४५० नवे रुग्ण सापडले आहेत. तर ५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अर्थात दर तासाला २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच, बिहार राज्यात नवीन रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण कमी होत आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वारंवार कमी होत आहे. बिहारमध्ये कोरोनाचे आतापर्यंत ३,४२,०५९ रुग्ण आढळले आहेत तर १,८४१ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या मंगळवारपर्यंत कोरोनाचे ५६,३५४ रुग्ण उपचारखाली आहेत. तर पाटणा येथील रुग्णालयांमधील मागणीनुसार फक्त २५ टक्के ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे ऑक्सिजनच्या अभावामुळे कोरोना संक्रमित रुग्णांचे जीवन धोक्यात आले आहेत.

दरम्यान, देशभरात रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून एकूण रुग्णसंख्येने तब्बल दीड कोटीचा टप्पा आता पार केला आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतात दररोज दोन लाखांहून अधिक कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद होत आहे. तर दोन दिवसांपूर्वी देशात आयसीयू बेडवर १.९३ टक्के रुग्ण होते. आता ही संख्या कमी होऊन १.७५ टक्के इतकी झाली आहे. २ दिवसांपूर्वी व्हेंटिलेटवर ०.४० टक्के रुग्ण होते. आता ही संख्या तेवढीच आहे. सोमवारी देशात ऑक्सिजन सपोर्टवर ४.२९ टक्के रुग्ण होते. ते आता ४.०३ टक्के इतके आहेत अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली.