Coronavirus : मंत्री छगन भुजबळांचा सूचक इशारा, म्हणाले- ‘…अन्यथा शासनाला लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल’

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवरून चिंता व्यक्त करत यावर भाष्य केलं आहे. कोरोना प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढायला पुन्हा सुरुवात झाली आहे. त्यामुळं कोरोनाच्या नियमांचं सर्वांनी काटेकोरपणे पालन करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा शासनाला लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल असा इशाराही त्यांनी दिला आहे.

छगन भुजबळांनी आज शिवजयंतीच्या निमित्तानं नाशिक शहारतील विविध कार्यक्रमांना भेटी दिल्या. त्यावेळी पंचवटी नाशिक येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी कोरोना रुग्णावाढीवरही भाष्य केलं. यावेळी त्यांनी लॉकडाऊनचा इशाराही दिला.

‘…तर मात्र यावर पुनर्विचार करून निर्णय घ्यावा लागेल’
यावेळी बोलताना छगन भुजबळ म्हणाले, राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळं अनेक जिल्ह्यात लॉकडाऊनचे निर्णय घेण्यात आले आहेत. नाशिक जिल्ह्यात अद्याप आपण निर्णय घेतलेला नाही. लॉकडाऊन करणं हे नागरिकांना आणि शासनाला देखील परवडणारं नाही. मात्र कोरोनाची रुग्णसंख्या वाढत राहिली तर मात्र यावर पुनर्विचार करून निर्णय घ्यावा लागेल असंही त्यांनी नमूद केलं.

‘लॉकडाऊनचा निर्णय पूर्णपणे नागरिकांच्या हातात आहे’
पुढं बोलताना ते म्हणाले, लॉकडाऊनचा निर्णय पूर्णपणे नागरिकांच्या हातात आहे. जर नागरिकांनी कोरोनाचे सर्व नियम काटेकोरपणे पाळले, मास्क सॅनिटायजर यांचा वापर नियमित केला तर हे शक्य आहे. अन्यथा शासनाला याचा पुनर्विचार करावा लागेल असंही ते आवर्जून म्हणाले.