Coronavirus : संशोधनातील नव्या माहितीनं प्रचंड खळबळ ! कुत्र्यांमधून देखील माणसांपर्यंत पोहोचतोय कोरोना व्हायरस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या वर्षभरापासून कोरोनाने जगात थैमान घातले आहे. जगात कोरोनाच्या रुग्णसंख्येने तब्बल 16 कोटींचा टप्पा पार केला असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान आता चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. कोरोनाचा विषाणू कुत्र्यांकडून माणसांकडे येत असल्याची धक्कादायक माहिती एका संशोधनातून समोर आली आहे. अद्याप याबद्दलचे संशोधन पूर्ण झाले नाही. मात्र संशोधनातून यावर शिक्कामोर्तब झाल्यास प्राण्यांकडून माणसांपर्यंत येणारा हा आठवा विषाणू ठरणार आहे. त्यामुळे नव्या माहितीने आता आणखी चिंता वाढली आहे.

आतापर्यंत झालेल्या संशोधनात प्राण्यांकडून माणसांपर्यंत पोहोचणारे 7 प्रकारचे विषाणू आढळले आहेत. यातील 4 विषाणूंमुळे साधारण सर्दी आणि 3 विषाणूंमुळे SARS, MERS आणि कोरोना सारखे आजार माणसांपर्यंत पोहचले आहेत. क्लिनिकल इन्फेक्शियस डिजीज नावाच्या जर्नलने नुकतेच एक संशोधन प्रसिद्ध केले आहे. मलेशियातील एका राज्यात रुग्णालयात दाखल असलेल्या 301 न्युमोनिया रुग्णांचे नेझल स्वॅब घेऊन त्याची चाचणी केली. त्यातील 8 नमुने कॅनाइन कोरोना विषाणूसाठी पॉझिटिव्ह होते. कॅनाइन कोरोना विषाणू कुत्र्यांमध्ये आढळून येतो. चाचणीत पॉझिटिव्ह आढळून आलेले बहुतांश नमुने 5 वर्षांखालील मुलांचे असल्याची माहिती संशोधन अहवालात आहे. रुग्णांच्या स्वॅब नमुन्याचे जीनोम सीक्वेंसिंगदेखील केले आहे. त्यातून CCoV-HuPn-2018 नावाचा एक नवा स्ट्रेन आढळला आहे. हा स्ट्रेन बऱ्याच अंशी कोरोना विषाणूसारखाच आहे. त्यामुळे मांजरी आणि डुकरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पसरतो. मात्र या विषाणूची रचना बहुतांशी कॅनाइन कोरोना विषाणूसारखीच आहे. यात कुत्र्यांमधून विषाणू पसरतो. संशोधनातून समोर आलेल्या या नव्या माहितीने सगळ्याची चिंता वाढवली आहे.