धक्कादायक ! कोरोनाबाधित 5 रुग्णांना चक्क शौचालयात केलं क्वारंटाईन

पांगी: पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. ऑक्सिजन, इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. वेळेत उपचार न मिळाल्याने अनेकांचा मृत्यू होत आहे. अशातच हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यातून एक संवेदनशून्य कारभाराचा प्रत्यय देणारी घटना समोर आली आहे. कोरोना झालेल्या 5 मजुरांना पांगी प्रशासनाने चक्क सुलभ शौचालयात क्वारंटाईन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा प्रकार समोर येताच एकच खळबळ उडाली आहे.

कामाच्या शोधासाठी पांगी येथे आलेल्या काही मजुरांची बस आगारात कोरोना टेस्ट करण्यात आली. यात 5 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानंतर या मजुरांना आगाराजवळील सुलभ शौचालयात क्वारंटाईन केले गेले. मजुरांना आगाराजवळच क्वारंटाईन केल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका आहे. चंबा भागाचे सीएमओ डॉ. कपिल शर्मा यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. कोरोना नियमांचे पालन करून मुजरांची सोय करा, त्याना उपचार द्या असे आदेश शर्मांनी दिले आहेत. या प्रकरणात संबंधित कंत्राटदारांवर कारवाईच्या सूचना देखील त्यांनी दिल्या आहेत.