ऑक्सिजन अभावी दिल्लीत डॉक्टरासह 8 जणांचा मृत्यू, अनेकांचा जीव धोक्यात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत असल्याने ऑक्सिजन, इंजेक्शन, बेडचा तुटवडा जाणवत आहे. याच दरम्यान आता दिल्लीतील बत्रा रुग्णालयात ऑक्सिजन अभावी एका डॉक्टरसह 8 रूग्णांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दिल्लीतील उच्च न्यायालयात बत्रा रुग्णालयाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे.

बत्रा रुग्णालयात सध्या ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा असून तासभरापेक्षा जास्त काळ ऑक्सिजन पुरवठा होत नाही. यामुळे एका डॉक्टरसह 8 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला. मात्र तोपर्यंत उशीर झाल्याने रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. बत्रा रुग्णालयाने न्यायालयात आमच्याकडे फक्त एक तास पुरेल इतकाच ऑक्सिजन शिल्लक असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान उत्तर प्रदेशातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्याठिकाणीही आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत आहे. मात्र मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यात बेड, ऑक्सिजन किंवा मेडिकल सुविधांची वाणवा जाणवत नसल्याचा दावा केला आहे. मात्र भाजपच्या नेत्यांनीच या दाव्याची पोलखोल केली आहे. भाजपा आमदार अरविंद गिरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना एका पत्र लिहले असून आपल्या 24 हून अधिक सहकाऱ्यांचा मृत्यू ऑक्सिजन न मिळाल्याने झाल्याचे गिरी यांनी पत्रात नमूद केले आहे. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे शेकडो लोक मरत असल्याचे म्हटले आहे.