COVID-19 वर मात केल्यानंतर धनंजय मुंडेंना रुग्णालयातून ‘डिस्चार्ज’, ‘कोरोना’ योद्ध्यांचे हात जोडून मानले आभार !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सोमवारी संध्याकाळी चारच्या सुमारास धनंजय मुंडेंना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयातून बाहेर पडताना धनंजय मुंडे यांनी हात उंचावून आणि हात जोडून डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. अकरा दिवस त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. दोन दिवसांपूर्वी त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. ही टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना सोमवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. परंतु पुढील 14 दिवस त्यांना होम क्वारंटाईन राहण्यास सांगण्यात आले आहे.

धनंजय मुंडे यांच्यासोबत लागण झालेले त्यांचे खासगी सचिव, एक स्वीय सहाय्यक, दोन वाहन चालक, एक अंगरक्षक यांनाही रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. या सर्वांची दुसरी कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. मात्र, आता केवळ एक अंगरक्षक आणि एक कुक अशा दोघांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्याही प्रकृती मध्ये सुधारणा होत आहे.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमधील तीन मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली होती. धनंजय मुंडे हे कोरोनावर मात करणारे तिसरे मंत्री आहेत. यापूर्वी जितेंद्र आव्हाड आणि अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी या आजारावर यशस्वीपणे मात केली आहे. त्यानंतर आता धनंजय मुंडे यांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.