आता होमिओपॅथीमध्येही ‘कोरोना’वर ‘नोसोड’, हाफकिन संस्थेत झालं संशोधन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून कोरोनावरील लसीच्या संशोधनास अनेक देशांनी सुरुवात केली आहे. काही लसींची संशोधन प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. भारतात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला असून भारतात देखील कोरोनावरील लस शोधण्यात आली आहे. सर्व स्तरांवर अ‍ॅलोपॅथी उपचार पद्धतीत कोरोनावर लसीविषयी संशोधन प्रक्रिया अंतीम टप्प्यात असतानाच होमिओपॅथी उपचार पद्धतीतही कोरोनावर ‘नोसोड’ (लस) औषधाचे संशोधन अंतिम टप्प्यात असल्याची दिलासादायक बाब समोर आली आहे.

परळ येथील हाफकिन संस्थेमध्ये नोसोडचे मार्च महिन्यापासून संशोधन सुरु आहे. हाफकिन संस्थेच्या सहाय्याने लाइफफोर्स होमिओपॅथीचे संचालक, ज्येष्ठ होमिओपॅथीतज्ज्ञ व संशोधक डॉ. राजेश शाह यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन सुरु आहे. वैद्यकशास्त्राच्या होमिओपॅथी पद्धतीत वेगवेगळ्या विषाणू तसेच जीवाणूंपासून औषध तयार करण्याची पद्धत दोनशे वर्षे जुनी आहे. लसीसारख्या असलेल्या या औषधांनी नोसोड असे म्हटले जात असल्याची माहिती डॉ. राजेश शाह यांनी दिली.

नोसोड इतर आजारांवर उपयुक्त

जीवाणूंपासून बनवलेली होमिओपॅथी औषधे इतर जीवाणूंपासून होत असलेल्या रोगांवरही प्रभावी ठरतात. या तत्त्वावर भारतीय बनावटीचे हे कोरोनावरील पहिले होमिओपॅथी नोसोड आहे. नसोड निमिर्ती प्रक्रिया लॉकडाऊनपूर्वी 15 मार्चपासून सुरु झाली असून 22 मे रोजी हे औषध तयार झाले. आता मानवी चाचणी प्रयोग सुरु असल्याचे डॉ. शाह यांनी सांगितले. तसेच औषधाच्या उपयुक्तेविषयी सांगताना शाह म्हणाले, यापूर्वी निर्मिती करण्यात आलेल्या नोसोडचा विविध आजारांसाठी वापर अत्यंत उपयुक्त ठरला आहे. तसेच हे औषध लाभदायी ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

औषध सुरक्षित असल्याचे निरक्षणात निष्पन्न

याशिवाय कोरोनानंतर होणाऱ्या आजारांवरही हे परिणामकारक ठरु शकते. नोसोडचे कोणतेही दुष्परिणाम नसून, सर्वांकरीता हे औषध अत्यंत सुरक्षित आहे. सध्या मानवी चाचणी प्रयोग सुरु असून यामध्ये 10 व्यक्तींना हे औषध देण्यात आले आहे. यात कोणताही धोका नसल्याचे निरीक्षणात आढळून आले. या प्रक्रियेत औषध सुरक्षित असल्याचे निष्पन्न झाले आहे. यासाठी संस्थेने विशेष समिती गठित केली असून यामध्ये राज्यातील होमिओपॅथी शाखेतील विशेषज्ञांचा समावेश आहे. तसेच समितीत राज्याच्या आयुष टास्क फोर्समधील ज्येष्ठ होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. जसवंत पाटील यांचाही सहभाग आहे.

ICMR कडून मान्यता मिळवण्याची प्रतीक्षा

राज्याच्या आयुष टास्क फोर्समधील ज्येष्ठ होमिओपॅथीतज्ज्ञ डॉ. जसवंत पाटील सांगितले, केंद्रस्तरावर अ‍ॅलोपॅथी औषध निर्मिती व संशोधन प्रक्रिेयेचा मार्ग सुकर आहे. परंतु होमिओपॅथी नोसोडचे संशोधन करण्यासाठी पारदर्शी प्रक्रिया नाही. त्यामुळे ही प्रक्रिया अद्यावत करणे गरजेचे असून सुधारणा करुन नवी प्रक्रिया होणे गरजचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. हे बदल केंद्रीय आरोग्य विभागाने प्रकर्षाने करणे गरजेचे आहे.त्यामुळे कोरोनावरील औषध सर्वसामान्यांसाठी उपलब्धतेचा मार्ग देखील मोकळा होईल आणि हे औषध कमी किमतीत उपलब्ध होईल, असे डॉ. पाटील यांनी नमूद केले आहे. त्यासाठी या औषधाला आयआयसीएमआर कडून मान्यता मिळणे महत्त्वाचे आहे, या प्रतीक्षेत असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.