Coronavirus : मुंबईकरांना दिलासा ! ‘कोरोना’चा धोका होतोय कमी, समोर आली ‘पॉझिटिव्ह’ आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात मुंबई हा कोरोनाचा मोठा हॉटस्पॉट ठरला आहे. मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. मुंबईत आज दिवसभरात 1208 रुग्ण आढळून आले तर 53 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 13 हजार 199 इतकी झाली असून मृतांचा आकडा 6 हजार 300 झाला आहे. मुंबईत आतापर्यंत 86 हजार 447 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 20 हजार 158 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर 76 टक्के झाले आहे. तर रुग्ण दुपटीचा दर 75 दिवासांवर पोहचला आहे. 23 जुलै ते 29 जुलै पर्यंत मुंबईतील एकूण कोरोनाच्या रुग्णांचा वाढीचा दर 0.93 टक्के आहे. शहर उपनगरात बुधवारपर्यंत कोरोनाच्या 5 लाख 16 हजार 714 चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुंबईत गुरुवारी नोंद झालेल्या 53 मृत्यूपैकी 40 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते.

आज मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये 35 रुग्ण पुरुष तर 18 रुग्ण महिला होत्या. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी एकाच वय 40 वर्षाखालील होते. 32 जणांचे वय 60 वर्षाहून अधिक आहे. तर उर्वरित 20 रुग्णांचे वय 40 ते 60 वयोगटातील आहे. शहर उपनगरात दिवसभरात 735 कोरोना संशयित रुग्णांना भरती करण्यात आले आहे. तर आतापर्यंत 79 हजार 939 रुग्णांना दाखल करण्यात आले आहेत. शहर उपनगरात 616 सक्रिय कंटेनमेंट झोन्स आहेत. तर 6173 सक्रिय सीलबंद इमारतीत आहेत. मागील 24 तासांत पालिका प्रशासनाने रुग्णांच्या संपर्कातील अतिजोखमी असलेल्या 5609 सहवासितांचा शोध घेतला आहे.