आळंदी नगरपालिकेचा मोठा निर्णय ! इंद्रायणी नदीत अस्थी विसर्जनास बंदी, पण…

आळंदी : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या काही दिवसांपासून तीर्थक्षेत्र आळंदी देवाची येथील पवित्र इंद्रायणी नदीत परगावातील लोकांना अस्थी विसर्जन करण्यास बंदी घालावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत होती. अखेर शुक्रवारी (दि. 23) आळंदी नगरपालिकेने याबाबतचा आदेश जारी केला आहे. येथील इंद्रायणी नदीत अस्थी विसर्जन करण्यास बंदी घातली आहे. मात्र स्थानिक नागरिकांना यातून सूट दिली आहे. आजपासून ते पुढील आदेश येईपर्यंत परगावच्या लोकांना इंद्रायणीत अस्थी विसर्जन करण्यास मज्जाव केला आहे.

राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक लॉकडाऊन लागू केला आहे. तर दुसरीकडे आळंदीसह लगतच्या गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यातच अलंकापुरीतील इंद्रायणी नदीत अस्थी विसर्जन करण्यासाठी परगावाहून मोठ्या संख्येने लोक येत असल्याने गर्दी होत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून आजपासून हा आदेश लागू केला आहे. सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास मुंबई पोलीस अधिनियम 1951 आणि भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम 1897 आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये कारवाई केली जाणार असल्याचे मुख्याधिकारी अंकुश जाधव व वरीष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी सांगितले.