Coronavirus : पुण्यातील ‘कोरोना’ संशयित कुटुंबावर सोलापुरातील गावाने टाकला ‘बहिष्कार’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – चीनमधील कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात थैमान घातले असून या व्हायरसने भारतात देखील शिरकाव केला आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेले 60 रुग्ण भारतात आढळून आले आहेत. महाराष्ट्रातील पुण्यात पाच रुग्ण आढळले आहे. पुण्यातील कोरोनाचा संसर्ग झालेल्या पाच रुग्णांपैकी एका रुग्णाच्या घरावर गावकऱ्यांनी बहिष्कार टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील एका गावातील कुटुंब पुण्यात वास्तव्यास असून त्यापैकी एकाला कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. ही बातमी समजताच गावकऱ्यांनी आम्हालाही हा आजार होईल, तुम्ही गाव सोडून जा असे म्हणत या व्यक्तीच्या कुटुंबावर बहिष्कार टाकला आहे.

पुण्यात राहणाऱ्या व्यक्तीला कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्याचे समजल्यानंतर गावकऱ्यांनी त्या व्यक्तीच्या घरच्यांना गाव सोडून जावे यासाठी तगादा लावला आहे. कुटुंबाने गाव सोडून जावे यासाठी गावकऱ्यांकडून त्यांना मानसिक त्रास दिला जात असल्याचे कोरोना बाधित रुग्णाच्या भावाने प्रसारमाध्यमांना सांगितले. तसेच या विरोधात विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात आली असल्याचेही त्याने सांगितले.

कोरोना बाधित रुग्णाच्या भावाने प्रसारमाध्यमांना सांगितले की, कोरोना व्हायरस या आजाराचे पाच रुग्ण पुण्यात आढळून आले आहेत. त्यापैकी एक माझा भाऊ आहे. माझ्या भावाला हा आजार झाल्याचे समजताच घरी जाऊन सर्वांना धीर दिला. काही वेळातच ही बातमी प्रसारमाध्यमांतून माझ्या भावाच्या नावासह प्रसारीत झाली. त्यानंतर काही तासांत गावकरी आमच्या घरी आले, विचारपूस करू लागले. तर काहींनी तुम्ही गावामध्ये राहू नका, तुमच्यामुळे आम्हाला देखील हा आजार होईल असे सांगितले.

रुग्णाच्या भावाने पुढे सांगितले की, एकीकडे भाऊ आजारी आहे तर दुसरीकडे गावकरी मानसिक त्रास देत असल्यामुळे अडचणी वाढल्या आहेत. अशा कठीण परिस्थितीमध्ये गावकऱ्यांनी आमच्या पाठिशी उभे राहणे गरजेचे होते, मात्र, सध्याचे चित्र वेगळेच पहायला मिळत आहे. त्यांनी आमच्या घरावर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे घरातील सर्वच चिंतेत आहेत. आता यावर सरकारने निर्णय घेऊन आम्हाला या संकटातून बाहेर काढावे, अशी मागणी कोरोनाग्रस्त रुग्णाच्या भावाने केली आहे.