Coronavirus : ‘कोरोना’च्या लढाईत महत्वाचा ठरणार हा UV टॉर्च, ‘व्हायरस’ला नष्ट करणार ?, जाणून घ्या

मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन – देशात आणि राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून त्याला रोखण्यासाठी संशोधन सुरु आहे. या संशोधनाचा एक भाग म्हणून वस्तूंच्या निर्जंतुकीकरणासाठी अतिनील किरणांच्या टॉर्चची निर्मिती राज्यात केली आहे. याबद्दलची माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

सामंत म्हणाले की, ‘दररोजच्या जीवनात आपण अनेक वस्तूंना हात लावतो आणि त्यातून दुसऱ्यांना व्हायरसचे संक्रमण होण्याची शक्यता असते. विज्ञानामधील उपलब्ध माहितीनुसार, एखादा व्हायरस अक्षम करण्याचा योग्य उपाय म्हणजे अतिनील करणे. या टॉर्चमुळे १६ ते ३३ वॅट एवढ्या क्षमतेच्या अतिनील किरणांचा पुरवठा होऊ शकतो. तसेच वस्तू, भाजीपाला किंवा फळे या टॉर्चच्या संपर्कात येऊन त्यावर अतिनील किरणं पडली तर एकसंधपणे ती किरणं विखरून जातात आणि त्यांचे निर्जंतुकीकरण होते. अतिनील किरणं पडल्यावर RNA ची रचना बदलून जाते. आणि व्हायरस काम करण्यास असमर्थ ठरतो आणि त्याचा नामशेष होतो.’

त्यांनी पुढे सांगितले की, चीनसोबत काही देशात अतिनील किरणांच्या मदतीने वेगवेगळी वाहने निर्जंतुक केली असून मोबाइल, संगणक, की-बोर्ड यांचेही निर्जंतुकीकरण केले आहे. भारतात पाण्यातील जीवजंतू मारून ते शुद्ध करायचे असल्यास याचा वापर केला जातो.

व्यवहार करताना अनेक वस्तू आणि नोटांच्या माध्यमातून व्हायरसचे संक्रमण वाढू शकते. याचाच विचार करून तज्ञांच्या मदतीने या टॉर्चची निर्मिती केली असून ही वापरण्यासाठी अगदी सोपी आहे. अतिनील किरणं आणि शरीराचा संबंध आला तर आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे याचा संबंध माणसाच्या शरीराशी येणार नाही, याची देखील काळजी घेण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

टॉर्च कोणी बनवली?
सॅनिटायझर टनेल तयार करणाऱ्या शिवाजी विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. आर.जी. सोनकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली अनिकेत सोनकवडे आणि पूनम सोनकवडे यांनी या टॉर्चची निर्मिती केली असून अनिकेत औरंगाबाद विद्यापीठातील दीनदयाळ उपाध्याय कौशल केंद्र येथे व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात शिकत आहे. पूनम ही पुण्यातील आबासाहेब गरवारे कॉलेजमध्ये बीएससी (सूक्ष्मजीवशास्त्र) च्या दुसऱ्या वर्षात शिकत असून सामंत यांनी या सर्वांचे अभिनंदन केले. या टॉर्चची निर्मिती मुंबईतील विद्याविहार पश्चिमेकडील पीएलए इलेक्ट्रो अप्लायन्सेस प्रा.लि. या कंपनीच्या साह्याने केली जात आहे.