वृद्ध आई वडिलांच्या औषधांचा खर्च पेलवत नसल्याने दांपत्याची आत्महत्या

कवठेमहांकाळ : पोलीसनामा ऑनलाईन – वृद्ध आई वडिलांच्या औषधोपचाराचा खर्च पेलवत नसल्यामुळे तालुक्यातील जायगव्हाण येथील गणेश प्रकाश पाटील (वय 35)आणि लीलावती गणेश पाटील (वय 31) या दांपत्याने आत्महत्या केली. दोघांनी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास विषारी औषध प्राशन केले. या प्रकाराची कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यातून आणि स्थानिकांनी दिलेली माहिती अशी, जायगव्हाण येथील गणेश पाटील आणि त्यांचे कुटुंबीय वडगाव रस्त्यावरील पाटील मळ्यात राहतात. गणेश पाटील यांचा लीलावती यांचे दहा वर्षांपूर्वी विवाह झाला. लीलावती यांचे अरळट्टी (ता. अथणी, कर्नाटक) महेर आहे. पाटील हे सध्या आई, वडील, सहा वर्षाचा मुलगा आणि तीन वर्षांच्या मुलीसह राहत होते. गेल्या काही वर्षांपासून गणेश यांचे आई आणि वडील दोघेही मधुमेहाने आजारी आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी त्यांच्या औषध उपचारावर त्यांनी मोठा खर्च केल्याचे गावातून सांगण्यात आले. त्याचबरोबर सध्याही औषधोपचाराचा खर्च सुरूच होता.
पाटील यांना चार एकर कोरडवाहू शेती आहे. बेताची परिस्थिती आणि कोरडवाहू शेतीतून उत्पन्न निघत नसल्यामुळे गणेश आणि त्यांची पत्नी लीलावती शेत मजुरी करीत होते. त्यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि आई वडिलांच्या औषधोपचाराचा खर्च करणे कठीण जात असल्यामुळे पाटील दांपत्य त्रस्त होते.
आर्थिक विवंचनेतून मार्ग कसा काढायचा, हा प्रश सतावत होता. त्याच बरोबर गावातील विकास सोसायटीतून पाटील यांनी कर्ज उचलले आहे. गावातील काही जणांकडून उसनवरीने पैसे घेतल्याचे समजते. आता कोणाकडे पैसे मागायचे आणि आई वडिलांचे उपचार करायचे? हा प्रश्‍न पाटील दांपत्यापुढे होता.
आज (बुधवार) सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास घरातील लोक पाहुण्यांकडे रक्षाविसर्जनासाठी गेल्याचे पाहून, घरी कोणीही नसताना गणेश आणि लीलावती यांनी विषारी औषध प्राशन केले. नऊ वाजण्याच्या सुमारास शेजारील लोकांना हा प्रकार समजल्यानंतर दोघांना रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र गणेश पाटील यांचा घरीच मृत्यू झाला. तर लीलावती यांना रुग्णालयात नेत असताना वाटेत मृत्यू झाला.
या प्रकाराची कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात बाळासाहेब नारायण पाटील यांनी वर्दी दिली आहे. अधिक तपास हवालदार पाटील करीत आहेत.