पानसरे, दाभोलकर हत्याप्रकरण : सीबीआयच्या तपासावर हायकोर्ट नाराज 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणी उच्च न्यायालयाने तपास यंत्रणांच्या तपासावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दोन्ही तपास यंत्रणांमधील समन्वयाचा अभाव, तपासातील कमतरतेमुळेच आणि आरोपपत्र दाखल करण्यास होणाऱ्या विलंबामुळेच आरोपी जामिनावर सुटतात. तुमचा तपास कधी पूर्ण होणार, असा संतप्त सवाल न्यायमूर्ती सत्य रंजन धर्माधिकारी आणि भारती डांगरे यांच्या खंडपीठाने सीबीआयला केला.

कॉम्रेड गोविंद पानसरे आणि नरेंद्र दाभोलकर हत्याकांडाची स्वतंत्र यंत्रणांमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी करणाऱ्या विविध याचिका उच्च न्यायालयात दाखल आहेत. या याचिकांवर न्यायमूर्ती एस.सी. धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

या वेळी या दोन्ही प्रकरणांत सीबीआय आणि एसआयटीने आपल्या तपासाचा प्रगती अहवाल न्यायालयात सादर केला. तसेच तपास सुरू असल्याचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी सांगताच न्यायालयाने नाराजी व्यक्ती केली. अजून किती दिवस तपास सुरू राहणार? असा सवाल केला.

सविस्तर अहवाल सादर करण्याबरोबरच चार विचारवंतांच्या हत्या प्रकरणांचा तपास करत असलेल्या अधिकाऱ्यांची नावे आणि विविध न्यायालयांत सुनावणीला उपस्थित राहणाऱ्या वकिलांची नावे सादर करण्याचे तपास यंत्रणांना आदेश देऊन याचिकेची पुढील सुनावणी १७ जानेवारीपर्यंत न्यायालयाने तहकूब केली.