Corona Precautions : ‘कोरोना’पासून बचाव करण्यासाठी आयुष मंत्रालयानं दिले 8 ‘मंत्र’, वाढेल रोगप्रतिकारशक्ती; जाणून घ्या घरगुती Tips

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयुष मंत्रालयाने रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काही घरगुती उपाय सुचवले आहेत. कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत असताना, हे काही आयुर्वेदिक उपाय आहेत, जे मानवी शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर ठरु शकतात. हे उपाय म्हणजे कोरोनावरील इलाज नाही तर शरीर सुदृढ ठेवण्यासाठी घरगुती उपाय आहेत. आयुष मंत्रालयाने सांगितलेल्या या उपायांना आयुर्वेदात खूप प्रभावी मानलं जातं.

आयुष मंत्रालयाने सांगितलेले घरगुती उपाय

– आयुष मंत्रालयाने सगळ्यांनाच गरम पाणी पिण्याचा सल्ला दिला आहे. दिवसभरातून जास्तीत जास्तवेळा गरम पाणी पिण्याचा प्रयत्न केला पाहिजे. याशिवाय गरम पाण्यात चिमुटभर मीठ आणि हळद घालून तुम्ही गुळण्या करु शकता.

– इम्यूनिटी वाढवण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी 20 ग्राम व्यवनप्राश रिकाम्या पोटी घ्या. तसेच हळद घातलेले दुधाचे सेवन करा. याशिवाय गुडूची घनवटी 500 मिलिग्राम, अश्वगंधा गोळी 500 मिलीग्राम दिवसातून दोनवेळा गरम पाण्यात खावी, यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

– रोज सकाळ संध्याकाळ न चुकता नाकात तिळाचे तेल किंवा नारळाचे तेल, याशिवाय गाईचे तुप घालावे. दिवसातून एक ते दोन वेळा ऑईल पूलिंग थेरेपी करावी.

– घरी तयार केलेले जेवण खावे. कारण या जेवणामध्ये हळद, जिरे, धणे, आलं, लसून यासारख्या मसल्यांचा वापर केलेला असतो. आणि हे जेवण पचण्यासाठी हलकं असते. याशिवाय तुम्ही तुमच्या आहारात आवळ्याचा समावेश करावा.

– आयुष नॅशनल क्लिनिकल मॅनेजमेंट प्रोटोकॉल्सनुसार, दररोज कमीत कमी 30 मिनिटं योगा किंवा प्राणायाम केले पाहिजेत. याशिवाय चांगली झोप घेतली पाहिजे. दिवसा न झोपता रात्री 7 ते 8 तासांची झोप आपल्या शरीराला आवश्यक आहे.

– ज्यांना चहा पिण्याची सवय आहे अशांनी तुळस, दालचीनी, आलं, काळी मिरीपासून तयार केलेली हर्बल टी किंवा काढ्याचे सेवन करावे. ही सर्व सामग्री 150 ML गरम पाण्यात घालून उकळून घ्या. त्यानंतर हे पदार्थ गाळून एकदा किंवा दोनवेळा सेवन करा. तुम्ही यामध्ये चवीनुसार गुळ, मनुके, वेलची घालू शकता.

– कोरोना काळात वाफ घेणे गरजेचे आहे. वाफ घेताना पुदीन्याची पाने, ओवा किंवा कापराचा वापर करावा. दिवसातून एकदा नक्कीच वाफ घेणे फायदेशीर ठरते. मात्र वाफ घेताना एक लक्षात ठेवा जास्त गरम पाण्याने वाफ घेऊ नका. कारण यामुळे त्वचेला समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

– खोकला आणि कफ पासून आराम मिळवण्यासाठी दिवसातून दोन वेळा लवंग, साखर, मध एकत्र करुन याचे मिश्रण दिवसातून दोन ते तीनवेळा घ्यावे. यामुळे आराम मिळतो.