Fact Check : ‘या’ घरगुती उपायांनी ब्लॅक फंगसवर उपचार होऊ शकतो? जाणून घ्या ‘त्या’ व्हायरल व्हिडीओचं सत्य

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   ब्लॅक फंगसचे रुग्ण अनेक राज्यांत आढळून येत आहेत. म्यूकरमायकोसिसने (ब्लॅक फंगस संक्रमण) कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. दिवसेंदिवस या रुग्णांच्या संख्येतही सातत्याने वाढ होत आहे. परिणामी, या आजारावरील योग्य उपचार आणि औषधांनीही राज्य सरकारांच्या चिंतेत भर टाकली आहे. अशा परिस्थिती सोशल मिडियावरही ब्लॅक फंगसवरील उपचारांसंदर्भातील काही टिप्स व्हायरल होत आहेत.

अशाच एका व्हायरल व्हिडिओत, तुरटी, हळद, सेंधव मीठ आणि मोहरीच्या तेलाने म्यूकरमाइकोसिसचा इलाज केला जाऊ शकतो, असं सांगण्यात आलं आहे. आहे. दरम्यान, पीआयबी फॅक्ट चेक टीमने या व्हायरल व्हिडिओमध्ये करण्यात आलेला दावा फेक असल्याचे म्हटले आहे. यात पीआयबीने म्हटले आहे, की ‘ब्लॅक फंगस एक गंभीर आजार आहे. याचे योग्य वेळी निदान होणे आणि त्यावर उपचार होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे, अशा प्रकारचा कुठलाही घरगुती उपचार करणे टाळावे. या आजारावर कुठलाही उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तुरटी, हळद, सेंधव मिठ आणि मोहरीच्या तेलाने ब्लॅक फंगस संक्रमणावर उपचार केला जाऊ शकतो, याला कसल्याही प्रकारचा वैज्ञानिक आधार नाही. तसेच, अशा कुठल्याही प्रकारच्या गंभीर आजारावरील उपचारांसाठी केवळ घरगुती टिप्सवर विश्वास ठेऊ नये.”

अवश्य लक्ष ठेवा ब्लॅक फंगस संक्रमणाच्या या लक्षणांवर एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितल्याप्रमाणे, चेहऱ्यावर एका बाजूला सूज, डोकेदुखी, सायनस, ताप, नाकातून रक्त येणे, नाकाच्या वरच्या बाजूस काळे घाव, जे लवकरच अधिक गंभीर होतात. ही म्यूकरमायकोसिसची सामान्य लक्षणं असू शकतात.

ही बुरशी कोठे आढळते?

“म्युकोरमायसीट्स नामक तंतुमय बुरशीचे तंतू म्युकोरमायकोसिसला कारणीभूत ठरतात. ते हवेत, मातीत, आणि अगदी अन्नातही आढळतात. हवेतील कवकधारी कनांच्या माध्यमातून ते शरीरात शिरकाव करू शकतात किंवा त्वचेला कापणे/भाजणे, अशी दुखापत झाली असल्यास ते त्वचेवरही आढळतात. या संसर्गाचे वेळेवर निदान झाल्यास, संभाव्य अंधत्व किंवा मेंदूचा संसर्ग टाळता येऊ शकतो,” म्युकोरमायकोसिससंदर्भात बोलताना एका पत्रकार परिषदेत डॉ. गुलेरिया म्हणाले.

“ह्युमिडीफायर (ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर वापरणाऱ्यांच्या बाबतीत) म्हणजेच आर्द्रताजनक स्वच्छ ठेवणे व वेळोवेळी बदलणे आवश्यक आहे. तसेच, ह्युमिडीफायरच्या बाटलीत जंतुविरहित सामान्य सलाईन वापरले पाहिजे व ते दररोज बदलायला हवे, मास्क घालण्याला पर्याय नाही. हवेतील बुरशीचे सूक्ष्मकण व तंतू नाकावाटे सहज शरीरात प्रवेश करू शकतात. यामुळे, संसर्गास अटकाव करण्याच्या दृष्टीने मास्क घालण्याचे महत्त्व दुपटीने वाढते. बांधकामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या/ तेथे भेट देणाऱ्या लोकांनी याकडे खासकरून लक्ष द्यायला हवे. एवढेच नाही, तर मास्क दररोज निर्जंतुकही करायला हवे,” असेही गुलेरिया यांनी म्हटले आहे.