फक्त 400 रुपयांत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा रिपोर्ट करून मिळतो निगेटिव्ह, दोघांवर FIR दाखल

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – कोरोना चाचणीच्या रिपोर्टमध्ये (Corona test report) गडबड करणा-या एका रॅकेटचा फर्दाफाश करण्यात आला आहे. कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह (Corona test report) आलेला असतानाही अवघ्या काही रुपयांमध्ये रुग्णांना निगेटिव्ह रिपोर्ट करून देत असल्याचा धक्कादायक प्रकार झारखंडमध्ये समोर आला आहे. या प्रकरणी चाचणी करणा-या एका लॅबची एनओसी रद्द करत दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

विकास (पूर्ण नाव समजू शकले नाही) आणि गौतम कुमार अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, झारखंडच्या धनबादमध्ये कोरोना चाचणीसाठी पॅथथकाईंड लॅब ही एक एजन्सी नेमण्यात आली होती. त्या एजन्सीच्या शाखेच्या माध्यमातून हा धक्कादायक प्रकार सुरू होता. याठिकाणी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना अवघ्या 400 रुपयांमध्ये चक्क निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र दिले जात होते. पॅथकाईंड लॅबवर अयोग्य पद्धतीने रुग्णांची नोंद केल्याचा आरोप करण्यात आला होता.

याबाबत तक्रार मिळाल्यावर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डीसी उमाशंकर सिंह यांनी वरिष्ठ अधिकारी श्याम नारायण राम यांच्या नेतृत्वात 5 सदस्यीय तपास समितीची नेमणूक केली. समितीने या प्रकरणाची तपासणी करत डीसी सिंह यांना अहवाल दिला. अहवालात म्हटले आहे की, पॅथकाईंड लॅबचा कर्मचारी विकास आणि अजून एक गौतम कुमार नावाची व्यक्ती हे रॅकेट चालवत होती. सिंह यांनी या दोघांविरूद्ध एफआयआर दाखल करत आपत्ती व्यवस्थापन अधिनियमांतर्गत कारवाईचे आदेश दिले आहेत.

डीसी सिंह यांनी पॅथकाईंड लॅबच्या वरिष्ठ विक्री अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावून 24 तासांमध्ये स्पष्टीकरण मागितले आहे. पॅथकाईंड लॅबच्या सर्व शाखांची एनओसी रद्द करत सुरक्षा रक्कमही जप्तीचे आदेश दिले आहेत. तपास समितीने आपल्या अहवालात प्रत्येक सॅम्पलची नोंद आरटी-पीसीआर ऍपच्या माध्यमातून केली जाते. रुग्णाची सविस्तर माहिती यात भरली जाते. त्या रुग्णाचा एसआरएफ क्रमांक जनरेट झाल्यावर सीएमएस पोर्टलमध्ये अपडेट केल्या जातो. यानंतर पोर्टलच्या माध्यमातून रिझल्ट डाऊनलोड केला जातो असे सांगितले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.