पार्टी पडली महागात ! बंगळुरूतील अपार्टमेंटमध्ये कोरोनाचा ‘उद्रेक’; आत्तापर्यंत 103 पॉझिटिव्ह

बंगळुरू : वृत्तसंस्था – कर्नाटकची राजधानी बंगळुरुमध्ये एका अपार्टमेंटच्या कॉम्प्लेक्समध्ये कोरोनाचा विस्फोट झाला. या अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या 103 लोकांचा कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. यामध्ये ड्रायव्हर, मेड आणि स्वयंपाक बनवणाऱ्यांचा समावेश आहे. तसेच या अपार्टमेंटमधील आणखी काही लोकांची टेस्ट करण्यात आली आहे.

बंगळुरूच्या एसएनएन राज लेकव्यू अपार्टमेंटमध्ये 6 फेब्रुवारीला एका पार्टीचे आयोजन केले होते. याच पार्टीमधून इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे, असे सांगितले जात आहे. अपार्टमेंटच्या 435 फ्लॅट्समध्ये 1500 लोक राहतात. ही अपार्टमेंट कॉम्प्लेक्स बिलेकाहाल्ली येथे बोम्मनहल्ली झोनच्या सीमेत आहे.

याबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले, की अपार्टमेंटमध्ये 6 फेब्रुवारीला झालेल्या पार्टीमध्ये सुमारे 500 जण उपस्थित होते. पण यातील सर्वाधिक लोकांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नव्हती. त्यामुळे त्यांना रुग्णालयातही दाखल करण्याची गरज भासली. पण हे प्रकरण जेव्हा उघड झाले तेव्हा काही लोकांना कोरोनाची लक्षणे दिसू लागली. त्यानंतर ही माहिती बंगळुरु महापालिकेला देण्यात आली.

कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये अनेक तरुण आहेत. सध्या त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. बंगळुरु महापालिकेने संपूर्ण अपार्टमेंट सॅनिटायज केली आहे. या अपार्टमेंटमधील 513 लोकांची रविवारी कोरोना टेस्ट करण्यात आली होती. तर 600 पेक्षा जास्त लोकांची सोमवारी कोरोना टेस्ट करण्यात आली होती. याशिवाय इतर 300 लोकांची मंगळवारी टेस्ट करण्यात आली.