खळबळजनक ! इंग्लंडहून नागपूरात आलेला तरुण ‘कोरोना’ पॉझिटिव्ह ?, नव्या स्ट्रेनच्या भीतीने प्रशासन सतर्क

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसने (Corona Virus) संपूर्ण देशाला वेठीस धरलं आहे. असं असताना इंग्लंडमध्ये नव्या कोरोना व्हायरसचा (New Corona Virus) स्ट्रेनचा (Strain) प्रादुर्भाव वाढत आहे. इंग्लंडमध्ये नवा कोरोना विषाणू सापडल्याने जगासमोर नवीन आव्हान उभे राहिले आहे. नवा विषाणू किती प्रभावी आहे यावर संशोधन सुरु असतानाच नागपूरमध्ये इंग्लंडहून आलेला तरुण कोरोना पॉझिटिव्ह निघाला आहे.

चिंताजनक बाब अशी की इंग्लंडच्या प्रवासाची पार्श्वभूमी असलेला हा 28 वर्षीय तरुण कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा रुग्ण असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. नागपूरात नव्या स्ट्रेनचा संशयित रुग्ण आढळून आल्याने महाराष्ट्राचे धाबे दणाणले आहेत. आता प्रशासन सतर्क झाले आहे. बाधित तरुणावर उपचार सुरु असून त्याचे नमुने पुढील तपासणीसाठी पुण्यातील एनआयव्ही प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

तरुण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्यांपर्यत पोहचण्याचं काम वेगाने सुरु झालं आहे. इंग्लंडमधून आल्यानंतर हा तरुण नागपूरसह गोंदियात अनेकांच्या संपर्कात आल्याची माहिती समोर आली आहे. इंग्लंडमध्ये कोरोनाच्या बदलत्या स्वरुपाची अनेकांना लागण झालीय. यामुळे या तरुणाला नव्या कोरोना व्हयरसची लागण झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

तरुणाचा पहिला अहवाल निगेटिव्ह

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुण हा 29 नोव्हेंबर रोजी नागपुरात आला आहे. भारतात आल्यानंतर त्याची विमानतळावर कोरोनाची चाचणी करण्यात आली. पण त्याचा अहवाल निगेटिव्ह आला होता. काही दिवसांनंतर तरुणाला कोरोनाची लक्षण जाणवू लागल्यानंतर 15 डिसेंबरला पुन्हा चाचणी करण्यात आली. ही चाचणी पॉझिटिव्ह आली. सध्या या तरुणाला वास ओळखता न येण्याचं लक्षण दिसत असून प्रकृती उत्तम आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या मित्रांची आणि कुटुंबीयांची तसेच मित्राच्या कुटुंबाची चाचणी करण्यात आली आहे.