Good News : भारतात SII कोरोनावर आणखी एक लस तयार होणार, अदार पूनावाला यांनी सांगितलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून शुक्रवारी पुणे शहरातील कोरोनाच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. तर एकीकडे अधिक प्रमाणात रुग्ण वाढत असतानाच, मात्र पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (Serum institute of india) मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पूनावाला यांनी एक आनंदाची बातमी दिली आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमार्फत कोविशिल्ड लशीनंतर आता कोवोवॅक्स (Covovax) लस मिळणार आहे. अशी माहितीत अदार पूनावाला यांनी ट्वीटद्वारे दिली आहे.

भारतात सध्या कोरोना प्रतिबंधकाच्या २ लशी दिल्या जात आहेत. मात्र आता आणखी एक लस तयार करण्यात येत आहे. देशात या तिसऱ्या कोरोना लशींची चाचणी सुरू झाली आहे. तर काही महिन्यांतच ही लसही सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे. ही बातमी सर्व भारतीयांसाठी महत्त्वाची आहे. तसेच अदार पूनावाला यांनी म्हटले आहे की, कोवोव्हॅक्स लस आफ्रिकन आणि UK वेरिएंटवरसुद्धा परिणामकारक आहे. ही लस ८९ टक्के प्रभावी आहे. या लशीचं भारतात वैद्यकीय चाचणी सुरू झाली आहे. सप्टेंबर २०२१ पर्यंत ही लस भारतात तयार होण्याची आशा आहे.

दरम्यान, सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड लस यूकेतील स्ट्रेनविरोधात प्रभावी आहे. तर आता नोवोवॅक्स (Novavax) लस दक्षिण आफ्रिकन आणि ब्राझील स्ट्रेनवर प्रभावी आहे. त्यामुळे कोरोनाच्या या स्ट्रेनविरोधातसुद्धा भारताकडे आता मोठं आणि प्रभावी लस उपलब्ध झालं आहे. ऑगस्ट २०२० रोजी अमेरिकेतील नोवोव्हॅक्स (Novavax) कंपनीशी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचा करार झाला आहे. त्यानुसार ही लस यावर्षी भारतात उपलब्ध होणार आहे. देशात कोरोनाचे रुग्ण अधिक वाढत आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या कोरोना स्ट्रेन्सची भर पडली आहे. अन्य देशात आढळलेले कोरोनाचे नवे स्ट्रेन भारतातही आढळून आले आहेत. त्यामुळे चिंता वाढते आहे. भारतात आतापर्यंत UK Strain दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलमधल्या स्ट्रेनची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत.