IND Vs ENG : आर. अश्विनने रचला इतिहास, कुंबळे-हरभजनपेक्षा वेगाने गाठला ‘जादुई’ आकडा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   भारतीय संघाचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने अहमदाबाद कसोटीदरम्यान इतिहास रचला आहे. आर अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये आपले 400 विकेट पूर्ण केले आहेत. विशेष म्हणजे अश्विनने ही कामगिरी केवळ 77 कसोटींमध्ये पूर्ण केली आहे. तो भारताकडून कमी वेळात 400 विकेट घेणारा दुसरा वेगवान गोलंदाज ठरला आहे.

तसे पाहिल्यास अश्विन हा भारताकडून 400 कसोटी विकेट घेणारा चौथा गोलंदाज आहे. याआधी कपिल देव, अनिल कुंबळे आणि हरभजन सिंग यांनी हा पराक्रम केला आहे. पण अश्विनने सर्वात वेगवान हा आकडा गाठला आहे. अनिल कुंबळेने 400 विकेट्ससाठी 85 कसोटी सामने घेतले, तर हरभजन सिंगने 96 कसोटी सामन्यांमध्ये हा आकडा गाठला. तर सर्वात वेगवान 400 कसोटी विकेट्सचा विश्वविक्रम मुरलीधरनच्या नावावर असून त्याने अवघ्या 72 सामन्यात ही कामगिरी केली. त्याने सर रिचर्ड हेडली आणि डेल स्टेन आणि रंगना हेराथ यांना मागे ठेवले आहे.

आर. अश्विनचे लक्ष्य आता भारताचा दुसरा यशस्वी कसोटी गोलंदाज होण्याचे आहे. हरभजनसिंगने 417 कसोटी विकेट घेतल्या असून आता अश्विन त्याला लवकरच पराभूत करू शकेल. भारताकडून अनिल कुंबळेने सर्वाधिक 619 विकेट घेतल्या आहेत. अश्विनने केवळ कसोटी क्रिकेटमध्ये 400 कसोटी विकेट्स घेतल्या नाही तर त्याच्या नावावर 2500 पेक्षा जास्त धावाही केल्या आहेत. 400 विकेट्स आणि 2500 पेक्षा जास्त धावा करणारा तो तिसरा भारतीय खेळाडू आहे. कुंबळे आणि कपिल देव यांनीही हा पराक्रम केला आहे.