लग्नविधी सुरु असतानाच 11 लाखांचे दागिने चोरीला

नाशिक : स्टेजवर लग्नविधी सुरु असताना नववधुच्या पित्याने स्टेजच्या मागे ठेवलेली हँडबॅग चोरीला गेली. त्या हँडबँगेत लग्नखर्चासाठीचे १ लाख रुपये १० लाख ८२ हजार रुपयांचे दागिने होते. ही घटना हॉटेल ज्युपिटर येथे ८ डिसेंबर रोजी घडली.
याप्रकरणी सुरेश मदनलाल बजाज (वय ५५, रा. शहापूर, जि़ ठाणे) यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

बजाज यांच्या मुलीचा विवाह हॉटेल ज्युपिटरमध्ये आयोजित करण्यात आला होता. लग्नात मुलीच्या अंगावर घालण्यासाठीचे दागिने, खर्चासाठीचे पैसे त्यांनी एका हँड बँगेत ठेवले होते. रात्री पावणे दहा वाजता मुहूर्तावर विवाह विधी सुरु असल्याने त्यांनी आपल्या जवळची हँड बॅग पाठीमागे स्टेजवर ठेवली व ते विवाह विधीमध्ये सहभागी झाले होते. याच दरम्यान चोरट्याने सर्वांची नजर चुकवून ही हँड बॅग चोरुन नेली. बँगेत २ लाख १० हजार रुपयांचा सोन्याचा फुल सेट, सोन्याचे झुमके, ५ लाख रुपयांचा डायमंडचा फुल सेट, दीड लाख रुपयांचे सोन्याची ५ नाणी, चांदीचे शिक्के, १ लाखांचा सोन्याचा हार,रोख १ लाख रुपये असा १० लाख ८२ हजार रुपयांचा ऐवज होता.