‘पिंपरी-चिंचवड शहरातील स्मार्ट सिटीच्या कामास विरोध करणार्‍यांवर गुन्हे नोंदविणार’ : CP कृष्ण प्रकाश

पोलीसनामा ऑनलाईन, पिंपरी, दि. 12 डिसेंबर : पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडकडून शहरात स्मार्ट सिटीची कामे सुरू असून या कामांना काही ठिकाणी विरोध होत आहे. या कामास विरोध करणार्‍यांवर सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हे दाखल करू, असा इशारा पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलाय.

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या संचालक मंडळाची 11 वी बैठक चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे पार पडली.

यावेळी आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले, स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या कामांत काही ठिकाणी खोडा घातला जातोय. जाणीवपूर्वक विरोध केल्याचे प्रकार प्रशासनाच्या निदर्शनास येत आहेत. अशा विरोधामुळे कामास विलंब होत आहे. यामुळे संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये मुद्दा उपस्थित केला. जाणीवपूर्वक कामांत अडथळे निर्माण करणार्‍यांवर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याच्या कलमाखाली गुन्हे दाखल केले जातील.

‘या’ संचालक मंडळावर कृष्ण प्रकाश, मिसाळ यांची निवड
पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळावर पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश आणि महापालिकेचे विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांची निवड केलीय. माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल काटे आणि माजी पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांच्या जागी या 2 सदस्यांची निवड केलीय.

पिंपळे सौदागरमध्ये स्मार्ट क्रीडांगण होणार
सायकलिंग आणि स्केटिंगसाठी पिंपळे सौदागर येथील लिनियर उद्यानामध्ये बीएमएक्स-प्ले एरियामध्ये अ‍ॅडव्हेंचर सायकलिंग व अ‍ॅडव्हेंचर स्केटिंग तयार केले जाणार आहे. हे स्मार्ट क्रीडांगण उभारण्याचा निर्णय बैठकीत घेतला आहे.