लसिथ मलिंगाच्या पत्नीचे ‘या’ क्रिकेटपटूवर गंभीर आरोप

कोलंबो : वृत्तसंस्था – श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा याची पत्नी तान्याने श्रीलंकेचा माजी कर्णधार थिसारा परेरावर गंभीर आरोप केले आहेत. श्रीलंकेच्या टीममधलं स्थान निश्चित करण्यासाठी थिसारा परेरानं श्रीलंकेच्या क्रीडा मंत्र्यांची मदत मागितल्याचा आरोप तान्यानं केला आहे. तिने हे गंभीर आरोप थेट सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे.

परेराची कामगिरी चांगली होत नव्हती. त्याला संघातून डच्चू देण्यात येणार होता. ही गोष्ट परेराला समजली. त्यावेळी परेरा थेट क्रीडा मंत्र्यांकडे गेला आणि त्यानंतर त्याचे संघातील स्थान अबाधित राहिले, असे तान्याने म्हटले आहे.

या सगळ्या प्रकारानंतर थिसारा परेरानं श्रीलंका क्रिकेटचे सीईओ ऍशले डिसिल्व्हा यांना पत्र लिहिलं आहे.  या सगळ्या प्रकरणामध्ये लक्ष घाला, कारण एका व्यक्तीच्या वैयक्तिक वैरामुळे आमचं हसं होत असल्याचं परेरा या पत्रात म्हणाला आहे.त्याचबरोबर या प्रकरणामध्ये श्रीलंकेच्या क्रिकेट मंडळाने हस्तक्षेप करावा, असे अपील केले आहे.

क्रिकेट मंडळाने  प्रकरणता लक्ष घालावे – परेरा

मलिंगाच्या बायकोनं केलेल्या आरोपांमुळे ड्रेसिंग रुममध्येही अस्वस्थता आहे. दोन वरिष्ठ खेळाडूंमध्ये असा वाद निर्माण झाल्यामुळे टीममधल्या युवा खेळाडूंसाठीही वातावरण खराब झालं आहे. मतभेद असताना आम्ही टीम म्हणून खेळू शकत नाही. टीमला स्थैर्य देण आणि टीममध्ये एकात्मता ठेवणं, हे कर्णधाराचं काम असतं. पण सध्याच्या परिस्थितीमध्ये टीममध्ये तसं काहीच नाही, असा मजकूर या थिसारा परेराच्या या पत्रात आहे.

या पत्रामध्ये परेराने लिहीले आहे की, “ जर मलिंगाची पत्नी सोशल मीडियावरून माझ्यावर गंभीर आरोप करणार असेल तर मी ते सहन करणार नाही. कारण लोकांना तिची गोष्ट खरी वाटेल आणि तिला सहानुभूती मिळेल. त्याचबरोबर लोकांचा विश्वासही कायम राहणार नाही. “तान्याच्या आरोपानंतर संघातील खेळाडूंचा माझ्याबरोबरचे बोलणे बदलले आहे. जेव्हा दोन अनुभवी खेळाडूंमध्ये वाद होतो तेव्हा संघातील वातावरण बिघडते. या साऱ्या गोष्टीमुळे संघाचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे क्रिकेट मंडळाने या प्रकरणता लक्ष घालायला हवे. हे प्रकरण जेवढ्या लवकर निकाली लागेल तेवढे संघासाठी ते फायद्याचे असेल, असे परेरा म्हणाला.

जानेवारी महिन्यामध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या सीरिजपासून लसिथ मलिंगाची श्रीलंकेच्या मर्यादित ओव्हरचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली. २०१७ साली थिसारा परेरा श्रीलंकेच्या मर्यादित ओव्हरचा कर्णधार होता. २००९ साली श्रीलंकेच्या टीमवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, परेराच्या नेतृत्वात श्रीलंकेची टीम पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेली होती. या साऱ्या प्रकरणामुळे श्रीलंकेच्या संघातील वातावरण दुषित झाल्याचे म्हटले जात आहे.