चक्रीवादळामुळे भरकटलेले पी 305 जहाज मुंबईजवळ समुद्रात बुडाले; जहाजावरील 176 जणांना वाचविण्यात यश तर 171 जण अजूनही बेपत्ता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अरबी समुद्रातील चक्रीवादळामुळे मुंबईजवळ दोन मोठी जहाजे बिघाड होऊन भरकटली त्यापैकी एक पी 305 हे जहाज बुडाले आहे. या जहाजावर 273 खलाशी होते. त्यापैकी 176 जणांना वाचविण्यात नौदलाला यश आले आहे. आज सकाळी हे जहाज बुडाले असून त्यातील 171 जण अद्याप बेपत्ता आहे.

चक्रीवादळामुळे मुंबईच्या समुद्रात असलेली पी 305 आणि गाल कन्स्ट्रक्टर ही दोन जहाजे भरकटली होती. त्यापैकी पी 305  हे जहाज मुंबई हायमधील हिरा तेल उत्खनन विहिरींच्या दिशेने भरकटत गेले होते. या जहाजावर 273  कर्मचारी, खलाशी होते. त्यांनी नौदलाकडे मदत मागितल्यावर नौदलाची आयएनएस कोची ही युद्धनौका मदतीसाठी गेली. त्यांनी या जहाजावरील 176  जणांची रात्रभर भर पावसात मोहिम राबवून सुटका केली. त्यानंतर हे जहाज बुडाले आहे. त्यावरील इतर 171 जण बेपत्ता झाले आहेत. त्यांचा नौदलाच्या हेलिकॉप्टरमार्फत समुद्रात शोध घेण्यात येत आहे. पाऊस, जोरदार वारे आणि उंचच उंच उठणार्‍या लाटा यामुळे शोध मोहिमेत अडथळा येत आहे.

जीएएल कन्स्ट्रक्टर हे दुसरे इंधनवाहू जहाज समुद्रात बंद पडून भरकटल्याचा संदेश काल नौदलाला मिळाला. त्यानंतर त्याच्या मदतीसाठी आयएनएस तलवार ही दुसरी युद्धनौका नौदल गोदीतून रवाना झाली होती. तिने या जहाजावरुन 137  खलाशांची सुटका केली आहे.