‘दादा, मी प्रेग्नंट आहे’ पोस्टरचा रहस्यभेद झाला

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या काही दिवसांपासून पुणे, मुंबईत सर्वत्र लावण्यात आलेल्या  ‘दादा, मी प्रेग्नंट आहे’ या पोस्टरने धुमाकुळ घातला आहे. त्यावरुन अनेक तर्क वितर्क करण्यात येत होते.

काही महिन्यांपूर्वी आपल्या प्रेयसीला मागणी घालताना एकाने सॉरी अशी पोस्टर लावली होती़ त्यानंतर अशाच प्रकारे एकाने पोस्टर लावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यामुळे हे पोस्टरही कोणीतरी खोचटपणे लावल्याची चर्चा रंगली होती. त्यात यामध्ये दादा हा शब्द असल्याने अनेकांनी हा दादा नेमका कोण अशी चर्चाही समोर आणली होती. काही राजकीय नेत्यांनी यावर संतप्त होत टिकाही केली होती. पण थांबा, असा कोणताही अर्थ काढू नका. कारण हे पोस्टर आहे, आगामी एका नाटकाचे.

पडलात ना बुचकळ्यात पण ते खरे आहे.

नाट्यरसिकांसाठी प्रिया बापट आणि सोनल प्रोडक्शन्स घेऊन येत आहे एक नवे कोरे नाटक ‘दादा,एक गुड न्युज आहे’. नुकतेच  ह्या नाटकाचे  पोस्टर सोशल नेटवर्किंग साईट वर रिलीज करण्यात आले. बहीण भावाच्या प्रेमळ आणि विश्वासू नात्याची गोष्ट आपल्याला ह्या नाटकाद्वारे पाहायला मिळेल. उमेश कामत आणि ऋता दुगुर्ळे ही भावा बहिणीची जोडी आपल्याला या नाटकात दिसणार आहे. उमेश ह्या नाटकामध्ये एक साधं नॉर्मल आयुष्य जगणारा, खंबीर, कर्तव्याची जाण असलेला आणि बहिणीवर विशेष प्रेम असणाऱ्या भावाची भूमिका निभावत असून, ऋता ही कॉलेजला जाणारी, आयुष्य एन्जॉय करणारी आणि भावावर जीवापाड प्रेम करणारी अशी बहीण साकारत आहे. ऋताचे हे रंगभूमीवरील पहिलेच व्यासायिक नाटक आहे. सोनल प्रोडक्शन निर्मित आणि  कल्याणी पाठारे लिखित ह्या नाटकाचे दिग्दर्शन अद्वैत दादरकर यांनी केली असून, नंदू कदम ह्या नाटकाचे निमार्ते आहेत. नेपथ्य प्रदीप मुळ्ये तर संगीताची धुरा ओंकार पाटील यांनी सांभाळली असून, आरती मोरे, ऋषी मनोहर आणि जयंत घाटे ह्या कलाकारांचा देखील समावेश नाटकात असणार आहे.

पण या नाटकाच्या जाहिरातीसाठी अशा वेगळ्या मार्गाचा वापर केल्याने लोकांमध्ये त्याची चांगलीच चर्चा रंगली होती.

You might also like