ऐकावं ते नवलच ! म्हशीच्या शेणामुळे मालकाला 10 हजाराचा दंड

ग्वाल्हेर : वृत्तसंस्था – भारतात कधी काय घडेल हे सांगता येणार नाही. अशीच एक अजब घटना मध्य प्रदेशातील ग्लाव्हेरमध्ये घडली आहे. रस्त्यावर पडलेल्या शेणामुळे थेट म्हशीच्या मालकालाच दंड ठोठावण्यात आला आहे. ग्वाल्हेर महापालिकेकडून म्हशीच्या मालकाला तब्बल दहा हजार रुपयांचा दंड करण्यात आला असल्याचे समोर आले आहे.

ग्वाल्हेर महापालिकेकडून म्हशीच्या मालकाला ठोठावण्यात आलेल्या दंडाच्या रक्कमेची रिसीट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. महापालिकेकडून एका नवीन रस्त्याचं काम सुरु होते. त्यावेळी बेताल सिंग नावाच्या डेअरी मालकाच्या एका म्हशीने रस्त्यावर घाण केली. नेमके त्याचवेळी रस्त्याच्या कामाचा आढावा घेण्यासाठी पालिकेचे आयुक्त या ठिकाणी आले. नव्या रस्त्यावर म्हशीचे शेण पडल्याचे पाहून त्यांनी म्हशीच्या मालकाला दंड करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.

यासंदर्भात ग्वाल्हेर महानगरपालिकेचे अधिकारी मनीष कनोजिया यांनी सांगितले, ग्वाल्हेर शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरु आहेत. रस्त्यावर आणि शहरातील इतर ठिकाणी कचरा होऊ नये, यासाठी पालिकेकडून खबरदारी घेतली जात आहे. रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांविरोधात कारवाई करत त्यांना दंड केला जात आहे. तसेच स्वच्छतेबाबतही जनजागृती करण्याचे काम सुरु आहे.

रस्त्याचे काम सुरु असताना बेताल सिंगच्या म्हशी रस्त्यावर फिरत होत्या. त्यांना सांगूनही त्याने म्हशींना हटवले नाही. आयुक्तांच्या आढावा दोऱ्यावेळी म्हशीचे शेण आढळून आले. तेव्हा बेतालसिंग विरोधात कारवाई करत 10 हजार रुपयांचा दंड ठोठावण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. डेअरी मालकाने चूक मान्य केली असून, महापालिकेच्या कार्यालयात दंड भरला असल्याची माहिती मिळाली आहे.