मुगल सराय रेल्वे स्थानक झाले दीनदयाल उपाध्यय जंक्शन

लखनौ : वृत्तसंस्था 

भारतातील सर्वाधिक व्यस्त रेल्वे जंक्शनपैकी चौथ्या क्रमांकावरील रेल्वे जंक्शन असलेले मुगल सराय जंक्शनचे नाव आता अधिकृतपणे दीन दयाळ उपाध्याय जंक्शन असे करण्यात आले आहे़ याबाबतची अधिसूचना नुकतीच काढण्यात आली आहे़
उत्तर प्रदेशात भाजपचे सरकार आल्यानंतर गेल्या वर्षी सर्वप्रथम १६ आॅक्टोंबर २०१७ रोजी मुगल सराय या रेल्वे स्थानकाचे नाव दीन दयाळ उपाध्याय असे नामकरण करण्यात आले होते़ आझमगड सारख्या मुस्लिम बहुल शहरात आपला हिंदुत्वाचा चेहरा अधिक आक्रमकपणे दाखविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे़ विशेष म्हणजे या रेल्वे स्टेशनचा पत्ता देताना पंडित दीन दयाळ उपाध्याय मार्ग, आझमगड, उत्तर प्रदेश असा दिला जातो.

मुगल सरायचा इतिहास
मध्य युगीन काळात पूर्व दक्षिण पूर्व भारताच्या माध्यमातून अफगाणिस्तानच्या शेर शाह सुरीने तयार केलेल्या ग्रँड ट्रंक रोड मार्गे उत्तर भारतात जाणारा रस्ता वापरला़ मुगल काळातच्या वेळीही हा रस्ता वापरण्यात आला़ ब्रिटीश काळात दिल्ली ते कलकत्ता यांना जोडणारा रेल्वे मार्ग तयार करण्यात आला़ त्यात १८६२ मध्ये येथील रेल्वे स्टेशनला मोगल सराय असे नाव देण्यात आले़ या रेल्वे स्टेशनच्या सभोवताली शहर वसले गेले़ या रेल्वे मार्गाचे १९६१ ते १९६३ दरम्यान विद्युतीकरण करण्यात आले़ आशिया खंडातील सर्वात मोठे मार्शलिंग यार्ड येथे आहे़ भारतीय रेल्वेची सर्वात मोठी वॅगन दुरुस्ती कार्यशाळा येथे आहे.

विशेष म्हणजे मोगलसराय हे माजी पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांचे जन्मस्थान आहे़ तर पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे या शहरात निधन झाले होते़ लालबहादुर शास्त्री यांच्यामागे मोठे पाठबळ नसल्याने त्यांचे नाव देण्याची मागणी होऊ शकली नाही़
मात्र, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्यामागे अख्खा संघ परिवार आणि भाजप आहे़ त्यात केंद्रात आणि राज्यातही भाजपचे सरकार असल्याने त्यांनी या महत्वाच्या रेल्वे जंक्शनचे नाव बदलून त्याचे पं़ दीनदयाळ उपाध्याय जंक्शन असे नाव दिले आहे़