दीपक सावंत यांचा आरोग्य मंत्री पदाचा राजीनामा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

कॅबिनेट मंत्री दीपक सावंत आमदार असलेल्या मुंबई पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी शिवसेनेकडून विलास पोतनीस यांना देण्यात आली आहे. दीपक सावंत यांचा पत्ता कट केल्यानंतर नाराज दीपक सावंत यांनी आरोग्य मंत्री पदाचा राजीनामा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे यांच्याकडे सुपुर्द केला. मात्र मुख्यमंत्र्यांनी दीपक सावंत यांना थांबण्याचा सल्ला दिला आहे.

मुंबईमधून उमेदवारी दिलेले विलास पोतनीस हे सध्या बोरीवलीचे विभाग प्रमुख आहेत. सावंत यांना उमेदवारी न दिल्याने नाराज होऊन त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र मुख्यमंत्री यांनी सावंत यांना थांबण्याचा सल्ला दिला आहे त्यामुळे नाराज सावंत नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीनंतर मुंबई शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूकही चुरशीची होण्याची शक्यता आहे. कारण, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणेही या निवडणुकीत एंट्री करणार आहेत. राणेंच्या माध्यमातून भाजप शिवसेनेची कोंडी करण्याची शक्यता आहे.

नारायण राणे सात जून रोजी मुंबईत मेळावा घेत आहेत. पक्ष स्थापनेनंतर मुंबईतला पक्षाचा हा पहिलाच मेळावा आहे. कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेत विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेचा पराभव केल्यानंतर नारायण राणे आता मुंबईतही शिवसेनेविरोधात दंड थोपटण्याची शक्यता आहे.