3 वर्षांपूर्वी शिर्डीतून बेपत्ता झालेल्या दीप्ती सोनी इंदूरमध्ये सापडल्या !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   इंदूर येथील साईभक्त मनोज सोनी १० ऑगस्ट २०१७ रोजी आपली मुले आणि पत्नी दीप्ती यांच्यासोबत शिर्डीला आले होते. शिर्डीत दिप्ती या खरेदी करण्यासाठी दुकानात गेल्या. तेथून त्या परत आल्याच नाहीत. शोधाशोध करूनही त्या सापडल्या नाहीत. त्यामुळे मनोज सोनी यांनी पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल केली. त्यानंतर बरेच दिवस झाले तरी दीप्ती सापडल्या नाहीत. मनोज सोनी यांचा पाठपुरावा सुरूच होता.

दरम्यान, तीन वर्षांपूर्वी शिर्डीतून गायब झालेल्या दीप्ती सोनी इंदूरमध्ये सापडल्या आहेत. त्या गायब झाल्याची घटना खूप गाजली होती. यासंबंधी उच्च न्यायालयातही याचिका दाखल झाल्याने शिर्डीतून मानवी तस्करी होते का, याचा तपास करण्याच्या सूचना कोर्टाने पोलिसांना दिल्या होत्या. दीप्ती सोनी शिर्डीतून जशा रहस्यमयरित्या गायब झाल्या, तशाच रहस्यमयरित्या त्या इंदूरमध्ये त्यांच्या बहीणीला आढळून आल्या आहेत. या सर्वांना चौकशीसाठी शिर्डीला आणण्यात आले आहे. (Shirdi Deepti Soni Missing Case)

पोलिसांनी केलेल्या तपासाविषयी उच्च न्यायालयाने नाराजीही व्यक्त केली होती. त्यामुळे पोलिसांनी पुन्हा एकदा यासाठी मोहीम हाती घेतली होती. मधल्या काळात त्यांनी शिर्डीतून हरवलेल्या व पुन्हा सापडलेल्या व्यक्तींची माहितीच्या अधिकारातून माहिती मिळविली. त्या आधारे त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. यावर सुनावणी घेताना शिर्डीतून मानवी तस्करी होते का, असा मुद्दा उपस्थित झाला. यासंबंधी तपास करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने पोलिसांना दिला. त्यामुळे हे प्रकरण आणखी गाजले.

तपास पथकातील शिर्डी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक दिपक गंधाले तपासासाठी इंदूरला गेले होते. परतीच्या प्रवासात असताना मनोज सोनी यांनी त्यांच्याशी संपर्क साधून आपली पत्नी इंदूरमध्येच आढळून आल्याचे सांगितले. शिर्डीतून रहस्यमयरित्या बेपत्ता झालेल्या दीप्ती रहस्यमयरित्या इंदूरमध्येच सापडल्याने पोलीसही चक्रावले आहेत. दीप्ती या बहीण किर्ती सोनी यांना १७ ऑगस्ट २०२० रोजीच नंदानगर भागात मिळून आल्या असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे आता पोलीस याचा सखोल तपास करीत आहेत. तसंच, आपली पत्नी शिर्डीतून हरवली होती ती इंदूरला कशी पोहचली. तीन वर्षे ती कोठे होते, तिच्यासोबत काय झाले, याचा तपास व्हावा, अशी मागणी आता मनोज सोनी यांनी केली आहे. शिर्डी पोलिसांनी तक्रारदार मनोज सोनी, दीप्ती सोनी आणि त्यांची बहीण किर्ती सोनी यांना चौकशीसाठी शिर्डीत आणले आहे.