चीन-पाक सीमेवर आणखी वाढेल ‘ताकद’ ! 2580 कोटींमध्ये ‘स्वदेशी’ कंपनीकडून पिनाका रॉकेट लॉन्चर खरेदी करतंय सरकार

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : सीमेवर चीनबरोबर तणाव निर्माण झाल्याने सैन्य शक्ती आणखी मजबूत करण्याच्या उद्देशाने संरक्षण मंत्रालयाने पिनाका रॉकेट लाँचर खरेदी करण्यासाठी 2580 कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षरी केली. संरक्षण मंत्रालयाने सोमवारी दोन आघाडीच्या देशांतर्गत संरक्षण कंपन्यांसह 2580 कोटी रुपये खर्च करून सहा सैन्य रेजिमेंटसाठी पिनाका रॉकेट लाँचर खरेदी करण्याचा करार केला. सैनिकी दलांची कार्यात्मक तयारी वाढविण्यासाठी चीन आणि पाकिस्तानला लागून असणाऱ्या सीमेवर पिनाका रेजिमेंट तैनात केले जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

टाटा पॉवर कंपनी लिमिटेड (टीपीसीएल) आणि लार्सन अँड टुब्रो (एल अँड टी) यांच्याशी करार करण्यात आले आहेत, तर संरक्षण क्षेत्रातील शासकीय उपक्रम भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (बीईएमएल) ला देखील या प्रकल्पाचा भाग बनवण्यात आले आहे. बीईएमएल असे वाहने पुरवेल ज्यांच्यावर रॉकेट लाँचर बसवले जातील. संरक्षण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, सहा पिनाका रेजिमेंटमध्ये ‘ऑटोमेटेड गन आयमिंग अँड पोझिशनिंग सिस्टम (एजीएपीएस)’ सह 114 लाँचर आणि 45 कमांड पोस्ट देखील असतील. निवेदनात म्हटले आहे की क्षेपणास्त्र रेजिमेंटचे काम 2024 पर्यंत सुरू करण्याची योजना आहे.

त्यात म्हटले गेले आहे की शस्त्रास्त्र यंत्रणेत 70 टक्के देशी सामग्री असेल आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. पिनाका मल्टीपल लाँच रॉकेट सिस्टम (एमएलआरएस) ला डीआरडीओने विकसित केले आहे. संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की, हा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे जो ‘आत्मनिर्भर’ होण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सार्वजनिक-खाजगी क्षेत्रातील सहभाग दर्शवितो.