दिल्ली HC ने केंद्र अन् राज्य सरकारला फटकारले, म्हणाले – ‘हे माझं कर्तव्य नाही असे तुम्ही म्हणू शकत नाही’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत असल्याने ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. दरम्यान दिल्लीतील अनेक रुग्णालयांत ऑक्सिजनचे संकट निर्माण झाल्याने दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र तसेच राज्य सरकारला फटकारले आहे. ऑक्सिनजन पुरवठा करणे केंद्र आणि राज्य सरकार दोघांचे कर्तव्य आहे. हे माझं कर्तव्य नाही असं तुम्ही म्हणू शकत नाही, असे म्हणत उच्च न्यायालयाने सुनावले आहे. तुम्ही प्रस्थापित पुरवठा साखळीला ग्राह्य धरत नसल्याचे दिसत आहे. ते दिल्लीला पुरवठा करत होते. आदेश दिलेले असतानाही टँकर का अडवण्यात आले? अशी विचारणा दिल्ली उच्च न्यायालयाने केली आहे.

यावेळी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी यावेळी दिल्ली सरकारची बाजू मांडणाऱ्या वकिलांना याप्रकरणी फौजदारी तक्रार दाखल केली जाऊ शकते असे सांगितले. गृहमंत्र्यांनी ऑक्सिजन टँकर्सना रुग्णावाहिकांप्रमाणे वागणूक देण्याचा आदेश दिल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावर कोर्टाने आम्ही हे समजण्यात अपयशी ठरलो आहोत. आम्ही आपणास पुनर्निर्मितीच्या वाटपावर विचार करायला सांगितले होते. पण यातील काहीच झाले नाही. त्यामुळे 21 लोकांनी आपला जीव गमावला आहे, अशा शब्दात फटकारले आहे. यावर तुषार मेहता यांनी युक्तिवाद करताना, माझ्याकडून पुरवठा झाला नाही असे नाही. हे माझ नाही तर राज्याचे कर्तव्य असल्याचे सांगितले. यावर उच्च न्यायालयाने हे तुमच्या दोघाचे कर्तव्य आहे. माझ कर्तव्य नाही असे तुम्ही म्हणू शकत नाही, असे म्हणाले. दिल्ली सरकारने यावेळी ऑक्सिजन रिफिलर्स नेमकी काय स्थिती आहे याची माहिती सरकारला देत नसल्याचे उच्च न्यायालयाला सांगितले. यादरम्यान दिल्लीच्या रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या INOX ने केंद्र सरकारने आम्हाला 80 मेट्रिक टन पुरवठा करण्यास सांगितले असताना दिल्ली सरकार आम्हाला 125 मेट्रिक मागत असल्याची माहिती दिली.