ग्रामपंचायत निवडणुकीनंतर राजकीय संन्यास घेण्याची धैर्यशील मोहिते-पाटलांची घोषणा, म्हणाले – ‘केवळ माझ्या चुकीमुळे एक जागा बिनविरोध झाली’

ADV

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन –  माजी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी अकलूज ग्रामपंचायत निवडणुकीची(Gram Panchayat elections) जबाबदारी आपल्याकडे दिली होती. मात्र, आपल्या चुकीने एक जागा बिनविरुद्ध झाल्याने, त्याबद्दलची नैतिक जबाबदारी स्वीकारत आपण ग्रामपंचायत निवडणूक(Gram Panchayat elections) झाल्यावर राजकीय संन्यास घेणार असल्याची घोषणा धैर्यशील मोहिते पाटील यांनी अकलूजमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना केली.

धैर्यशील मोहिते-पाटील म्हणाले, “मोहिते-पाटील कुटुंबावर प्रेम करणाऱ्या सर्वांनी अकलूज ग्रामपंचायतीची जबाबदारी आपणावर सोपवली होती. मागील १३ वर्षांपासून ती आपण व्यवस्थित पार पाडत होतो. पण, अकलूज ग्रामपंचायत उमेदवारांचे अर्ज भरताना काही गोष्टींकडे आपले दुर्लक्ष झाले. पाच नंबर प्रभागात एका महिलेस उमेदवारी देण्यात आली होती. पंरतु, आपल्या नावावर बागवान नावाचा एक इसम त्या महिलेकडे गेला व दोन कागदांवर संबंधित महिलेच्या सह्या घेत त्यांचा उमेदवारी अर्ज काढण्यात आला. तसेच संबंधित महिला उमेदवाराच्या पूरक अर्जामध्ये जातीय प्रवर्गाचा उल्लेख देखील वकिलाकडून चुकीचा झाल्याने या ठिकाणी आमचा उमेदवार राहिला नाही.”

ADV

“त्यामुळे विरोधी पक्षाचा उमेदवार बिनविरुद्ध निवडून आल्याने, ही जबाबदारी स्वीकारत आपण ग्रामपंचायत निवडणूक झाल्यानंतर राजकीय संन्यास घेत आहोत. त्यापूर्वी, ग्रामपंचायत निवडणुकीतील अन्य सर्व उमेदवारांचा प्रचार १५ जानेवारीपर्यंत आपण ताकदीने करुन त्यांना निवडून आणू. तेव्हाच राजकारणातून बाहेर पडू,” असेही धैर्यशील मोहिते-पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

दरम्यान, धवलसिंह मोहिते-पाटील यांच्याविरुद्ध अकलूज ग्रामपंचायत निवडणुकीची जबाबदारी विजयसिंह मोहिते-पाटील यांनी धैर्यशील मोहिते-पाटील यांच्याकडे सोपवली होती. त्यातच दुर्लक्ष झाल्याने विरोधी गटातील एक उमेदवार निवडून आला. तोच पराभव धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या जिव्हारी लागल्याने त्यांनी राजकीय संन्यासाची घोषणा केली. त्याच पार्श्वभूमीवर आगामी काळात अकलूज आणि माळशिरस तालुक्याचे राजकारण कोणत्या वळणावर जाते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.