विद्यार्थी चांगला की वाईट हे मार्कशीट ठरवते, धनंजय मुंडेंचे पंकजांना प्रत्युत्तर

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – परळीत गुरुवर्य आबासाहेब वाघमारे यांचा अमृतमहोत्सवी कार्यक्रम काल पार पडला. यावेळी लोकनेते गोपीनाथ मुंडे नटराज रंग मंदिरात व्यासपीठावर पंकजा आणि धनंजय मुंडे एकत्र आले होते. यावेळी पंकजा मुंडेंनी वक्तशीरपणावरुन बंधू धनंजय यांना टोला लगावला, तर धनंजय मुंडेंनीही बहिणीला प्रत्युत्तर देण्याची संधी सोडली नाही.

मी एक चांगली विद्यार्थिनी आहे म्हणून मी वेळेवर आले, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी उशीरा येणाऱ्या धनंजय मुंडे यांना टोला लगावला. मी वेळेत आले, मात्र कार्यक्रम उशिरा सुरु झाला. दुसऱ्या कार्यक्रमाला जाणं गरजेचं आहे, त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करते’ असं म्हणत कार्यक्रम संपण्याच्या आधीच पंकजा मुंडे निघून गेल्या.

पंकजा यांच्या या वक्तव्यावर धनंजय मुंडेंनीही प्रत्युत्तर दिले. ‘चांगले विद्यार्थी लवकर येतात आणि वेळेआधीच जातात, हे मला पहिल्यांदाच समजलं. शेवटी, मार्कशीटवर कोण विद्यार्थी चांगला, कोण वाईट हे ठरतं. मात्र वेळेला आम्ही कायम सोबत असतो, हे निश्चित’ असं उत्तर धनंजय मुंडेंनी दिलं.विरोधी पक्ष आधी बोलत असतो आणि त्याचे उत्तर सत्ताधारी देत असतो. मात्र इथे उलट झालं आहे. कदाचित भविष्याची त्यांना चाहूल लागली असावी, असंही पुढे धनंजय मुंडे म्हणाले. यावेळी उपस्थितांनीही धनंजय मुंडेंच्या भाषणाला दाद दिली.

साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील उत्तुंग नाव असलेल्या वाघमारे गुरुजींच्या कार्यक्रमात गुरूजींचा गौरव ग्रंथ ‘सृजनामृत’, पुस्तक ‘रुजवण’ या मूल्य विचार संग्रहाचे प्रकाशन झाले. या कार्यक्रमात गुरुजींची सर्व ग्रंथसंपदा ‘ब्लॉग’ वर उपलब्ध करण्यात आली आहे. या नेत्रदीपक सोहळ्यास सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. इंद्रजित भालेराव, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे, प्रा. फ. म. शहाजिंदे, नगराध्यक्षा सौ. सरोजनीताई हालगे मंचावर उपस्थित होते. हा गौरव सोहळा साहित्यिक, शैक्षणिक, राजकीयदृष्ट्या सर्व रसिकांना एक आगळीवेगळी पर्वणी ठरला.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us