धनंजय मुंडे ‘जेन्युयन’ माणूस, पक्ष योग्य निर्णय घेईल : आमदार रोहित पवार

बारामती : पोलीसनामा ऑनलाईन –  राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात जर कोणी व्यक्ती षडयंत्र करत असेल तर, त्यात खोलात जाण्याची गरज आहे. त्यांच्या मनात खोट असती तर ते व्यक्त झाले नसते, पण ते व्यक्त होतात याचा अर्थ समजून घ्यायला हवा की ती व्यक्ती जेन्युयन आहे, असे मत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले.

आ. रोहित पवार यांनी सपत्नीक शुक्रवारी (दि. 15) लिमटेकच्या जि. प. शाळेत ग्रामपंचायत निवडणूकीत आपला मतदानाचा हक्क बजावल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी राजेंद्र पवार व सुनंदा पवार यांनीही या प्रसंगी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी आ. पवार यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली.

धनंजय मुंडे यांचा प्रश्न हा वैयक्तिक स्वरुपाचा आहे. त्याचा तपास सुरु आहे, पोलिस तपास करीत आहेत. जो पर्यंत सर्व तपास पूर्ण होत नाही, तो पर्यंत या विषयावर बोलणे उचित होणार नाही. पक्षाचे नेते या बाबत योग्य निर्णय करतील. मात्र मुंडे यांनी स्वतःहून सर्व परिस्थिती सर्वांसमोर ठेवली आहे असे ते म्हणाले. ‘नबाब मलिक यांच्या जावयाबाबत त्यांनी स्वतःच न्यायव्यवस्थेवर विश्वास व्यक्त केला असल्याने या बाबत तपास पूर्ण झाल्यानंतरच अधिक बोलता येईल, असेही पवार म्हणाले.

आ. रोहित पवार यांच्या कर्जत जामखेड मतदार संघात शंभरहून अधिक ग्रामपंचायतीत निवडणूक होत आहे, यात 90 हून अधिक ग्रामपंचायतीत दोन्ही पॅनेल राष्ट्रवादीच्या किंवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे आहेत. 20 ग्रामपंचायतीत भाजप विरुध्द राष्ट्रवादी व काँग्रेस यात लढत होत आहे. दहा ते बारा ग्रामपंचायतीत भाजपचे वर्चस्व आहे, माझ्यासाठी याच ग्रामपंचायती अधिक महत्वाच्या आहेत, तेथे परिवर्तन घडेल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला आहे.

लोकप्रतिनिधी सर्वात शेवटी लस घ्यावी

‘कोरोना लसीकरणाला उद्यापासून (दि. 16) प्रारंभ होणार आहे. कोरोनायोध्दांना ही लस सर्वप्रथम दिली जाणार आहे. त्या नंतर टप्याटप्याने लसीकरण होणार आहे, कोणीही घाई करु नये, यात लोकप्रतिनिधी सर्वात शेवटी लस घेतील, सर्व प्रथम लोकांना लस मग लोकप्रतिनिधींनी घ्यावी, असा आम्ही विचार करत असल्याचे आ. पवार म्हणाले.