खरंच, Mount Everest ची उंची घटलीय का ?, जगभरातील देशांना पडलेल्या प्रश्नांचा नेपाळकडून होणार उलगडा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   जगातील सर्वांत मोठं शिखर असलेल्या माउंट एव्हरेस्टची उंची कमी झाल्याची चर्चा सुरू असल्याने नेपाळने या शिखराची उंची मोजण्याचे ठरवले आहे. सन 2015 साली नेपाळमध्ये झालेल्या विध्वंसक भूकंपानंतर माउंट एव्हरेस्टच्या उंचीवरून अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. जगातील अनेक देशांना पडलेल्या या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचे काम नेपाळने हाती घेतले असून, मंगळवारी यासंदर्भात उघडपणे माहिती देण्यात येणार आहे.

नेपाळमध्ये 2015 साली झालेल्या विध्वंसक भूकंपामुळे एव्हरेस्ट शिखराच्या आणि परिसरातील डोंगर रांगांचा काही भूभाग ढासळल्याचा अंदाज आहे. त्यामुळेच माउंट एव्हरेस्टची उंची कमी तर झाली नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नेपाळने यासंदर्भात डेटा गोळा केला असून, माउंट एव्हरेस्टच्या सध्याच्या उंचीबाबत ते मंगळवारी अधिकृत घोषणा करणार आहेत. विशेष म्हणजे गेल्या वर्षभरापासून नेपाळने माउंट एव्हरेस्टची उंची मोजण्यासाठी डेटा कलेक्शनचे काम केले आहे. नेपाळ सर्वेक्षण विभागाने जगभरातील मीडिया चॅनेल्स आणि पत्रकारांना आमंत्रण दिले आहे.

त्यामध्ये, माउंट एव्हरेस्टसंदर्भातील उंचीच्या कार्यक्रमाची माहिती दिली आहे. तसेच, कार्यक्रमात गेल्या वर्षभरापासून या कामात स्वत:ला झोकून देत काम करणाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार असल्याचेही सर्वेक्षण विभागाचे महाव्यवस्थापक सुशील नरसिंह राजभंडारी यांनी सांगितले आहे.

नेपाळ सरकारच्या मतानुसार 2015 साली झालेल्या विनाशकारी भूकंपामुळे माउंट एव्हरेस्टसह इतरही डोंगर रांगांच्या उंचीत काही बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जगातील सर्वांत उंच शिखर असलेल्या माउंट एव्हरेस्टची उंची मोजण्याचे काम हाती घेतले होते. सर्वे ऑफ इंडियाद्वारे 1954 साली घेतलेल्या मोजमापानुसार माउंट एव्हरेस्ट शिखराची उंची 8,848 मीटर एवढी आहे. त्यानंतर, 1975 मध्ये चिनी सर्वेक्षकांनी माउंट एव्हरेस्टची उंची मोजली होती. त्यावेळी समुद्रसपाटीपासून या शिखराची उंची 8,848.13 मीटर उंच सांगितली होती.