खा. दिलीप गांधी यांच्या उमेदवारीवर गंडांतर ?

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – नगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना पुन्हा लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे. महापालिका निवडणुकीत पक्षाला मिळालेले अपयश व पक्षातील स्थानिक नेत्यांचा त्यांना होणारा विरोध आदी विविध कारणांमुळे गांधी यांचा पत्ता कट होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या नगर दौऱ्यानंतर गांधी यांच्या उमेदवारीवर गंडांतर येण्याची चर्चा अधिक तीव्रतेने होऊ लागली आहे. अहमदनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या नेतृत्वाची धुरा खासदार दिलीप गांधी यांच्यावर होती. मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष यांच्यासह अनेक मंत्र्यांनी नगरमध्ये जाहीर सभा घेतल्या. पक्षाने शक्य तेवढी ताकद नगरमध्ये लावली. परंतु तरीही अवघ्या 14 जागा मिळाल्या. तसेच खासदार गांधी यांचे सुपुत्र सुवेंद्र व सूनबाई दीप्ती गांधी यांचा दारुण पराभव झाला.
दरम्यान, पक्षांतर्गत गटबाजी मोठ्या प्रमाणावर उफाळून आली आहे. पक्षामध्ये त्यांच्याविरोधात मोठा गट तयार झाला आहे. त्यांचा गांधी यांना तीव्र विरोध आहे. तसेच गेल्या साडेचार वर्षात त्यांच्याकडून मतदारसंघात म्हणावे तेवढे काम झालेले नाही. उड्डाणपुलाची त्यांची घोषणा कामाचा शुभारंभ करू शकली नाही.
खासदार दानवे यांच्या नगर दौऱ्यात त्यांनी नगर मतदारसंघाचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही, असे सूचक वक्तव्य केले होते. नगरच नव्हे, तर राज्यात कोठेही उमेदवार निश्चित झाला नाही, अशी सावरासावर त्यांनी केली. परंतु नगर पूर्वी बीड येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी बीड मधून खा. प्रीतम मुंडे याच लोकसभेच्या उमेदवार असतील, असा दावा केला होता. बीडमध्ये ठामपणे बोलणारे दानवे नगरमध्ये मात्र सावध पावित्र्यात बोलताना दिसले.
तसेच भाजपाच्या राज्यातील 11 विद्यमान खासदारांची तिकीट कापले जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. नगरमध्ये निवडणुकीत झालेली भाजपची पीछेहाटीमुळे खासदार गांधी यांचे राजकीय वजनही चांगलेच कमी झाले आहे. नुकत्याच खासदार गांधी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपला महापौर व उपमहापौर हे दोन्ही पदे मिळाली असली, तरी पक्षाला अवघ्या 14 जागा मिळाल्याने गांधी यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महापालिका निवडणुकीत पक्षाला समाधानकारक यश मिळू न शकल्यापासून खासदार गांधी हे काहीसे शांत असल्याचे जाणवत आहे. महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत पक्षाने बाजी मारली असली, तर त्या राजकीय चर्चेत खासदार गांधी कुठेही दिसले नाही. त्यामुळे गांधी यांचा पत्ता होऊ शकतो, असे राजकीय जाणकारांचे सांगितले जात आहे.