अखेर दिंडी प्रमुखांना भेटवस्तू मिळणार

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

न्यायालयाच्या आदेशामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका खर्चातून दिंडी प्रमुखांना भेटवस्तू देता येत नसल्याने नगरसेवकांच्या स्वखर्चातून ताडपत्री किंवा तंबू देण्याचा निर्णयावर सोमवारी शिक्कामोर्तब झाला. यामुळे आषाढी वारीत भेटवस्तू देण्याची खंडित होणारी परंपरा चालू राहिली. सोमवारी महापालिकेत सर्व पक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत हा भेट स्वरूपात देण्याचा निर्णय झाला असल्याचे महापौर नितीन काळजे यांनी यावेळी जाहीर केले.

आषाढी वारीतील संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील दिंडीप्रमुखांना पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे दरवर्षी भेटवस्तू देऊन सन्मान केला जातो. ही गेल्या अनेक वर्षांची परंपरा यंदा खंडीत होण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचे वृत्त ‘पोलिसनामा ऑनलाईन’वर प्रसिद्ध झाले. त्यानंतर राजकीय पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी टिका केली. यावर चारी बाजूने होऊ लागलेली टिका आणि राष्ट्रवादीने घेतलेली भूमिका यामुळे सत्ताधारयाना ‘युटर्न’ घ्यावा लागला. सर्वपक्षीय नगरसेवक, आमदारांचे मानधन देऊन दिंडीप्रमुखांना भेटवस्तू देन्यासाठी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी सोमवारी सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक बोलवली.

[amazon_link asins=’B071HD619S’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’44797ce8-7de7-11e8-b45c-67db3a8567f1′]

महापौर कार्यालयात झालेल्या बैठकीला सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले, अपक्ष आघाडीचे कैलास बारणे, नगरसेवक शत्रुघ्न काटे, अतिरिक्त आयुक्त प्रविण अष्टीकर, तसेच वारकरी सांप्रदायातील बापू महाराज मोरे चालक टाळगाव चिखली दिंडी सोहळा, बाळासाहेब हरगुडे, अशोक मोरे, उत्तमराव साने, रमेश मोरे, बाळासाहेब साने, गणपत आहेर, बाळासाहेब मोरे, दत्तात्रय भालेकर, नारायण बोऱ्हाडे, डी.डी.फुगे, कांतीलाल साने, अरूण दाभाडे आदी उपस्थित होते.

महापौर नितीन काळजे म्हणाले, न्यायालयाच्या आदेशामुळे यंदाच्या वर्षी वारकऱ्यांना भेटवस्तू देण्यास अडचण निर्माण झाली होती. मात्र आज सर्व गटनेते, प्रशासन यांच्याशी चर्चा करून भेटवस्तू देण्याचा निर्णय झाला आहे. प्रशासनाला या वस्तू खरेदीत अडचण येत असेल तर सर्व पक्षाच्या नगरसेवकांच्या मानधनातून ही भेटवस्तू खरेदी करा असा आदेश प्रशासनाला दिला असल्याचे ते म्हणाले. उरलेले दिवस आणि बाजारातील उपलब्धता त्यानुसार ताडपत्री किंवा तंबू खरेदी करण्यात येणार आहे. दरम्यान होत झालेल्या विलबांमुळे वारकरी बांधवासमोर महापौरांनी दिलगिरी देखील व्यक्त केली.